BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 08:46 IST2025-08-20T08:43:23+5:302025-08-20T08:46:20+5:30

Mumbai Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

best employees cooperative credit society election 2025 result shashank rao panels won 14 seats mahayuti sahakar samruddhi panels get 7 seats and thackeray group mns utkarsha on zero seat | BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

Mumbai BEST Election 2025 Result: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०२५-२०३० या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या निवडणुकीच्या निकालात शशांक राव यांच्या पॅनलला तब्बल १४ जागा मिळाल्या. तर महायुतीला ७ जागांवर विजय मिळवता आला. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उभ्या शिवसेना-मनसेच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही, अशी माहिती मिळाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक चर्चेची ठरली. ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीने एकात्मक पॅनल उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधू आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. उद्धवसेना व मनसे यांचे 'उत्कर्ष पॅनल' रिंगणात होते. तर, महायुतीकडून भाजपा प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची 'समर्थ बेस्ट कामगार संघटना' आणि शिंदेसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची 'राष्ट्रीय कर्मचारी सेना' एकत्र आल्या आहेत. त्यांनी 'सहकार समृद्धी पॅनल'ची निर्मिती केली होती. या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे जसे पॅनल होते तसेच माजी नगरसेवक सुनील गणचार्य यांचे भाजप कामगार संघांचेही पॅनल होते आणि कामगार नेते शशांक राव यांचेही पॅनल होते. या अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या निकालात ठाकरे बंधू आणि महायुतीला तगडी टक्कर देत शशांक राव यांच्या पॅनलने बाजी मारत तब्बल १४ जागांवर विजय मिळवला.

भर पावसात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, मतमोजणीला विलंब

१८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या निवडणुकीत सर्वच मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसातही या निवडणुकीसाठी ८३ टक्के मतदान झाल्याचे सांगितले जात होते. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनेलने कमाल करुन दाखवली. बेस्ट पतपेढीच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे. 

दरम्यान, बेस्टच्या निवडणुकीत २१ पैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागांवर लढत होते. मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर या निवडणूकीला खूप महत्त्व निर्माण झाले होते. ठाकरे गटाने आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. निवडणूक प्रचार जसा रंगात आला तशी ही निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड अशीच झाली. परंतु, शशांक राव यांच्या पॅनलने सगळा डाव उलटवत तब्बल १४ जागांवर विजय प्राप्त केला.

बेस्ट पतपेढी निवडणूक अंतिम निकाल

शशांक राव पॅनल - १४
प्रसाद लाड आणि महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनल  - ७
राज ठाकरे (मनसे) - उद्धव ठाकरे (ठाकरे गट) उत्कर्ष पॅनल  - ०

 

Web Title: best employees cooperative credit society election 2025 result shashank rao panels won 14 seats mahayuti sahakar samruddhi panels get 7 seats and thackeray group mns utkarsha on zero seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.