२.७७ लाख 'टुरिस्ट'ची 'परे'ला पसंती गेल्या आर्थिक वर्षात 'टुरिस्ट' तिकिटातून १.३१ कोटींचा महसूल; सुट्टीच्या दिवशी सुविधेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 09:49 IST2026-05-03T09:48:31+5:302026-05-03T09:49:57+5:30
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या योजनेचे वाढते महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. सुट्टीच्या दिवशी आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून या तिकिटांचा विशेष वापर होत असल्याचे दिसते.

२.७७ लाख 'टुरिस्ट'ची 'परे'ला पसंती गेल्या आर्थिक वर्षात 'टुरिस्ट' तिकिटातून १.३१ कोटींचा महसूल; सुट्टीच्या दिवशी सुविधेचा लाभ
मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवास अधिक सोयीचा आणि परवडणाऱ्या दरांत व्हावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'टुरिस्ट तिकीट' योजनेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात या तिकिटांवर २ लाख ७७ हजार ३९२ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून १ कोटी ३१ लाख ३४ हजार २९० रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर अमर्यादित प्रवासाची सुविधा देणारी ही योजना प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. एक, तीन आणि पाच दिवसांच्या मुदतीची तिकिटे उपलब्ध असल्याने पर्यटक, विद्यार्थी, तसेच अल्पकालीन मुक्काम करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात या सुविधेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या योजनेचे वाढते महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. सुट्टीच्या दिवशी आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून या तिकिटांचा विशेष वापर होत असल्याचे दिसते.
तिकीट खिडक्यांवरील गर्दीत घट
चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत-कसारा या मार्गावर या योजनेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या योजनेमुळे महसूल वाढण्यासोबतच तिकीट खिडक्यांवरील गर्दीही काही प्रमाणात कमी झाली आहे. एकाच तिकिटावर वारंवार प्रवास करता येत असल्याने प्रवाशांचा वेळही वाचत आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६चा आढावा
६६,५७६ तिकीट विक्री
२,७७,३९२ प्रवासी
१,३१,३४,२९०
रुपये महसूल जमा
प्रवाशांच्या गरजेनुसार विविध प्रकारची तिकिटे उपलब्ध करून दिली जात असून, मुंबई आणि गुजरातमधील प्रवाशांमध्ये 'टुरिस्ट तिकीट'ची मागणी वाढत आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत असून, अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.
विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.
जानेवारी महिन्यात सर्वाधिक प्रवासी
पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये सर्वाधिक २५ हजार २९८ प्रवाशांनी टुरिस्ट तिकिटांचा वापर केला. या महिन्यात ११ लाख ८३ हजार रुपयांचा महसूल मिळाला. नववर्ष आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या काळात पर्यटन प्रवासाची मागणी वाढली आहे.