राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी आता पोलिसांची आणखी २१४४ पदे! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 05:00 IST2019-12-03T04:57:58+5:302019-12-03T05:00:01+5:30

उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत.

2144 more police posts for smooth transport in the state! | राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी आता पोलिसांची आणखी २१४४ पदे! 

राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी आता पोलिसांची आणखी २१४४ पदे! 

मुंबई : राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत. तीन उपायुक्त, ६ उपअधीक्षकांसह २७ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्वाधिक ६२० पदे देण्यात आली आहेत. गृह विभागाने अलिकडेच घटकनिहाय पदांच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे.
उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागांची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
वाहतूककोंडीच्या समस्येवर ठोस कारवाईसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचिवल्या. त्यानुसार वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पदांची निर्मिती करण्याची सूचना होती. त्यांच्याकडे रस्त्यावरील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे रस्त्यावर सोडून देण्यात आलेली तसेच या वाहनांसोबतच बेवारस वाहने हटविणे ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या वाढणाºया समस्या लक्षात घेता या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संंबंधित अधिकारी, अंमलदारांनी विविध उपाययोजना राबवायच्या आहेत.
न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतूक शाखांकरिता विविध दर्जाची एकूण २१४४ पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव या वर्षी २३ जानेवारीला गृह विभागाला सादर केला होता.

नव्याने निर्माण करण्यात येणारी संवर्गनिहाय पदे
पद संख्या
अधीक्षक ३
उपअधीक्षक ६
निरीक्षक २७
साहाय्यक निरीक्षक ६३
उपनिरीक्षक १०८
साहाय्यक फौजदार १२६
हवालदार ३७९
शिपाई ११४३
चालक शिपाई २८९

Web Title: 2144 more police posts for smooth transport in the state!