सहा महिन्यात १० गुन्हे : अशी एक मुलगी काँग्रेसमध्ये !

By अतुल कुलकर्णी | Updated: May 18, 2026 07:39 IST2026-05-18T07:38:46+5:302026-05-18T07:39:26+5:30

राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि तरुण मुलं निवडून येतील  अशी भूमिका घेतली होती. त्याला किमान बारा वर्ष होऊन गेली.

10 crimes in six months: Such a girl in Congress zeenat shabrin | सहा महिन्यात १० गुन्हे : अशी एक मुलगी काँग्रेसमध्ये !

सहा महिन्यात १० गुन्हे : अशी एक मुलगी काँग्रेसमध्ये !

-अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई 

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, घरातला एकही सदस्य राजकारणात नसताना, एक तरुण मुलगी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभी राहते. निवडून येते. सहा महिन्यांत मुंबईसारख्या शहरात वेगवेगळी आंदोलने करताना त्या मुलीवर दहा गुन्हे दाखल होतात. तिचे नाव झीनत शबरीन. एकीकडे काँग्रेस दिवसेंदिवस दुर्मिळ आणि दुर्लभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना काँग्रेससाठी प्रचंड आशादायीच म्हणावी लागेल. राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि तरुण मुलं निवडून येतील  अशी भूमिका घेतली होती. त्याला किमान बारा वर्ष होऊन गेली. या कालावधीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेस संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे खजिनदार व प्रसारमाध्यम चेअरमन अक्षय जैन, संघटन महासचिव प्रवीणकुमार बिरादार, उपाध्यक्ष कपिल ढोके, महासचिव प्राची ताकतोडे, सचिव अभिषेक अवचार असे उच्चशिक्षित, इंजिनियर, डबल ग्रॅज्युएट झालेले अनेक तरुण वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आले. यापैकी अनेकांच्या घरी राजकीय पार्श्वभूमी नाही. राजकारणात येणाऱ्या या तरुणांची ही पहिलीच पिढी आहे. त्यातल्या किती तरुणांना जुन्या जाणत्या नेत्यांनी पुढे येण्याची संधी दिली? त्यांच्या पाठीवर थाप देत, तुम्ही लढा, आम्ही सोबत आहोत, असे सांगितले? किती तरुण अध्यक्षांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी मानाचे स्थान दिले? त्यांच्या मांडीला मांडी लावून पक्ष वाढीसाठी त्यांच्यासोबत किती प्रदेशाध्यक्षांनी चर्चा केली? या व अशा प्रश्नांचे आत्मपरीक्षण करायची आता वेळ आली आहे. 

आत्मपरीक्षणातून जर नकारात्मक उत्तरे मिळाली तरी अजूनही वेळ गेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. वरिष्ठ नेत्यांनी अशा तरुण नेतृत्वाच्या पाठीशी कुठलेही राजकारण न करता ताकदीने उभे राहावे लागेल. तसे झाले नाही तर काँग्रेसमध्ये तरुण पिढी येणारच नाही. जुन्या लोकांना पद सोडवत नाही. तीन-चार टर्म आमदारकी मिळवलेले नेते पद सोडायला तयार नसतात. तर नवीन तरुण पिढी सक्रिय राजकारणात कशी येणार? 

भाजपचा विचार केला तर अनेक प्रस्थापित नावे पटापट डोळ्यासमोर येतात. दुसऱ्या फळीतील नेते देखील आता बऱ्यापैकी सीनियर होऊन स्थिरावू लागले आहेत. परंतु तिसऱ्या चौथ्या फळीतील नेत्यांच्या नशिबी अजूनही संघर्षच आहे. तिसऱ्या चौथ्या फळीतल्या नेत्यांना आता संधी दिली जावी अशी मोठी भावना भाजपमध्येही आहे. कारण हे नेते देखील आता वयाच्या चाळिशीमध्ये आले आहेत. पाच-सहा टर्मचे आमदार, दोन-तीन वेळा मंत्री राहिलेले नेते यांची संख्या पक्षामध्ये खूप मोठी आहे. भाकरी फिरवण्याची गरज जशी काँग्रेसमध्ये आहे तशीच ती भाजपमध्येही निर्माण झाल्याचा सूर आहे.

गेल्या सहा महिन्यात मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर नीट पेपरफुटी प्रकरण, महिला आरक्षण विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना, गिग कामगार न्याय अभियान, गोरेगाव मधील नेस्को ड्रग्ज प्रकरण, भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी, जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद, उन्नाव बलात्कार प्रकरण, इंडिगो विमानसेवा संकट, भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, संविधान पदयात्रा आणि प्रास्ताविक वाचन अभियान, मतचोरीविरोध, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, मुंबई मेट्रो आणि लोकल रेल्वेमध्ये मतचोरीविरोधी अभियान अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर झीनत शबरीन आणि तरुण कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलने केली. राज्यभरात निवडून आलेल्या युवक काँग्रेसच्या तरुण अध्यक्षांनी यापैकी किती आंदोलने केली? त्याचा हिशोब ठेवताना यापैकी किती विषय प्रदेश काँग्रेसने राज्य पातळीवर आंदोलनासाठी निवडले? याचीही उत्तरे वरिष्ठ नेत्यांनी दिली पाहिजेत. आपणही करायचे नाही आणि दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही ही वृत्ती मुंबई आणि प्रदेश काँग्रेसला पूरक आहे की मारक याचा विचार संबंधित नेत्यांनी करावा.

आजचे वरिष्ठ नेते तीन वर्षांनी निवडणुका होतील तेव्हा कुठे आणि कसे असतील हे आज कोणीही सांगू शकत नाही. कोणाचे नाव आणि वय नव्याने सांगण्याची गरज नाही. पक्षात सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे केवळ झीनत शबरीन सारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या असंख्य तरुणांना काँग्रेसला जाणीवपूर्वक सोबत घ्यावे लागेल. भाजपने पक्षप्रवेशासाठी दरवाजे उघडले तर किती पक्षांच्या कार्यालयांना कुलुपे लावावी लागतील याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. तीन वर्षे कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे तीन वर्षे तरुण पिढीला, कार्यकर्त्यांना काम द्यावे लागेल. वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतील. हे करताना व पक्ष वाढवताना तो तरुणांच्या हाती जाईल यासाठी काँग्रेसला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. असे झाले नाही तर पुढच्या लोकसभा, विधानसभेला काँग्रेस पक्षाला कंदील लावून उमेदवार शोधून आणावे लागतील..! ती वेळ येऊ नये ही सदिच्छा.

Web Title : युवा कांग्रेस नेता पर मामले, पार्टी पुनरुद्धार की उम्मीद जगी

Web Summary : बिना राजनीतिक पृष्ठभूमि वाली युवा कांग्रेस नेता ज़ीनत शबरीन पर सक्रियता के लिए कई मामले दर्ज हैं। लेख में सवाल उठाया गया है कि क्या वरिष्ठ नेता ऐसी उभरती प्रतिभाओं का समर्थन करते हैं, कांग्रेस और भाजपा दोनों में युवाओं को शामिल करने और पार्टी को पुनर्जीवित करने के लिए पीढ़ीगत बदलाव की आवश्यकता पर प्रकाश डाला गया है।

Web Title : Young Congress Leader Faces Cases, Sparks Hope for Party Revival

Web Summary : Zeenat Shabrin, a young Congress leader with no political background, faces multiple cases for her activism. The article questions whether senior leaders support such emerging talents, highlighting the need for generational change within the Congress and BJP to engage youth and revitalize the party.