योकोहामा मंडळाची जपानमध्ये गणेशोत्सवाची दशकपूर्ती, पंढरीचे महात्म्य सांगणारा देखावा 

By संदीप आडनाईक | Updated: September 3, 2025 17:02 IST2025-09-03T17:01:06+5:302025-09-03T17:02:30+5:30

या सोहळ्यासाठी प्रीतम कुदळे, अरविंद आखरे यांच्यासह कोल्हापूरचे रोहन पडवळे या जपानमधील भारतीय सदस्यांनी पुढाकार घेतला

The Yokohama Mandal, which maintains its ties with its homeland despite living abroad is celebrating the tenth anniversary of Ganeshotsav in Japan this year | योकोहामा मंडळाची जपानमध्ये गणेशोत्सवाची दशकपूर्ती, पंढरीचे महात्म्य सांगणारा देखावा 

योकोहामा मंडळाची जपानमध्ये गणेशोत्सवाची दशकपूर्ती, पंढरीचे महात्म्य सांगणारा देखावा 

संदीप आडनाईक

कोल्हापूर : परदेशात राहूनही मायभूमीशी असलेले नाते जपणारे योकोहामा मंडळ जपानमध्ये यंदा गणेशोत्सवाची दशकपूर्ती साजरी करत आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर, दिंडीने चालत जपानच्या भूमीतच पंढरीचे महात्म्य सांगणारा “आषाढी एकादशी आणि पंढरपूरचा विठोबा” या संकल्पनेवरील देखावा या मंडळाने सादर केला.

जपानमध्ये भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रसार करणारे योकोहामा मंडळ यंदा गणेशोत्सवाची दशकपूर्ती साजरी करत आहे. आषाढीच्या संकल्पनेनुसार बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक ज्या उत्साहात निघाली, त्याच जल्लोषात लेझीम, टाळ आणि ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकही निघाली. उत्साह आणि एकीचे प्रदर्शन करत जपानमधील मराठी बांधवांनी परदेशात असतानाही श्रद्धेने या पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सवात रांगोळ्या, धूपदीप, मोदक, आरत्या असा पूजाविधी साग्रसंगीत पार पडला.

दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात सुमारे ८०० भक्तांना पारंपरिक पत्रावळींवर महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत जपानी नागरिकांचाही उत्साही सहभाग असतो, हीदेखील अनेक वर्षांची खास परंपरा झाली आहे. या सोहळ्यासाठी प्रीतम कुदळे, अरविंद आखरे, विजय कदम, अश्विन आवळे, हरेश सोनार, जितेंद्र निकम, गौरव मोघे, दुर्गेश मांडवाले, कौस्तुभ कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूरचे रोहन पडवळे या जपानमधील भारतीय सदस्यांनी पुढाकार घेतला.

खेळातून भारतीय परंपरेचा जागर

जपानमधील भारतीय मुला-मुलींना आकर्षक उपक्रमांद्वारे वारीची ओळख करून देण्यात आली. बुद्धिबळ स्पर्धा आणि ट्रेझर हंट सारख्या सर्जनशील खेळांतून चिमुकल्यांसमोर वारकरी परंपरेचा जागर करण्यात आला. गणपती बाप्पा आणि विठ्ठल या एकाच चैतन्य तत्त्वाच्या दोन रूपे या सोहळ्यात विशेष अधोरेखित झाले.

योकोहामा मंडळाचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता परदेशातील भारतीय समाजासाठी एक भक्तिरसाचा मेळावा, सांस्कृतिक दुवा आणि सामाजिक बंध दृढ करणारा उत्सव ठरला. दहा वर्षांच्या प्रवासात या मंडळाने भारतीय संस्कृती, भाषा आणि सण यांचे दृढीकरण केले आहे. - रोहन पडवळे, सदस्य, योकोहामा मंडळ, जपान.

Web Title: The Yokohama Mandal, which maintains its ties with its homeland despite living abroad is celebrating the tenth anniversary of Ganeshotsav in Japan this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.