मराठी छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. तसेच बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता त्यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. यात त्यांनी दिवंगत अभिनेते सतीश तारे (Satish Tare) यांची खास आठवण सांगितली आहे. येड्यांची जत्रा, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, बालक पालक, वळू, एक होता विदूषक अशा चित्रपटातून सतीश तारे यांनी विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या होत्या. विनोदाचे अचूक टायमिंग हेरणाऱ्या सतीश तारे यांचे ३ जुलै २०१३ रोजी यकृताचा विकार झाल्याने निधन झाले.
किरण मानेंनी सतीश तारे यांचा फेसबुकला फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिले की, ...आमच्यातनं जाऊन तुला आज नऊ वर्ष झाली ! नाटकात तू खाली पडल्यावर, शरीराची खत्त्तरनाक नागमोडी वळणं घेत वर उसळी मारायचास... टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तशीच मागच्या वर्षीची ही पोस्ट 'सर्रकन' वर आलीय भावा...तुला काय म्हणू गड्या? अष्टपैलू? हरहुन्नरी? गुणी?? अफलातून-कलंदर-अवलिया??? नाय नाय नाय नाय.. ही सग्ग्गळी विशेषणं फिकी पडतील इतका महान होतास तू ! पण बेफिकीरपणे जगलास आणि त्याच बेफिकीरीने गेलास. आम्हा सगळ्यांचं डोंगराएवढं नुकसान करून ठेवलंयस माहितीय का तुला...? तू कधीच कुणाची नक्कल केली नाहीस. 'स्वत:ची एक वेगळीच श्टाईल असलेला' खराखुरा विनोद'वीर' होतास तू... साध्या-साध्या वाक्यांच्याही विशिष्ठ उच्चारातून - बिनचूक शब्दफोडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तुझ्यासारखा अफाट नट मी आजवर पाहिला नाही. तुझी 'आंगीक लवचिकता' केवळ अ फ ला तू न ! नादखुळा !! जबराट !!!