उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ हे भारताच्या राजकारणातील महत्वाचं नाव आहे. योगी आदित्यनाथ यांच्यावरील बायोपिकची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली. सिनेमाची पहिली झलकही समोर आली होती. आता योगी आदित्यनाथ यांच्यावरील 'अजेय' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यावरील 'अजेय' या सिनेमाचा टीझर १.१६ मिनिटांचा आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ यांचे एक सो एक डायलॉग ऐकायला मिळत आहेत. "मुझे नेताओं की तरह बात करना नही आता", "आप सबको एक भयमुक्त प्रदेश देने के लिए माफियों का उनके घुटनों पर लाके उनसे माफी मगवाऊंगा", "बाबा आते नही प्रकट होते है" हे संवाद लक्ष वेधून घेत आहेत. सिनेमाच्या टीझरमध्ये योगी आदित्यनाथ यांचा योगीपासून ते नेता बनण्याच्या प्रवासाची एक झलक पाहायला मिळत आहे.
'१२th फेल' फेम अभिनेता अनंत जोशी या सिनेमात योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अनंत जोशीचा जबरदस्त लूक टीझरमध्ये पाहायला मिळतोय. याशिवाय 'अजेय' सिनेमात परेश रावल आणि भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेता निरहूआ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास 'अजेय' सिनेमातून उलगडणार आहे.
हा सिनेमा शांतनु गुप्ता यांचं बेस्टसेलर पुस्तक 'द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर' यावर आधारीत आहे. रविंद्र गौतम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अनंत जोशी, परेश रावल, निरहूआ यांच्यासोबत सिनेमात अजय मेंगी, पवन मल्होत्रा, राजेश खट्टर, गरिमा सिंह हे कलाकारही झळकणार आहेत. येत्या १ ऑगस्टला सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.