गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे. पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारला प्रचंड विरोधामुळे मागे घ्यावा लागला होता. त्यानंतरही मराठी भाषेच्या अवमान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दरम्यान, आता वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी हिने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का, अशी मुक्ताफळे केतकी चितळे हिने उधळली आहेत.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारिक केलेल्या एका व्हिडीओमध्ये केतकी चितळे म्हणाली की, आपण आज अभिजात भाषेच्या दर्जाबाबत बोलुयात. अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषा ही स्वतंत्र असली पाहिजे, अन्य भाषेवर आधारित असू नये, अशी अट होती. मात्र मराठी, बंगाली आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ही अट २०२४ मध्ये काढून टाकण्यात आली. आता अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना देऊन टाका असं माझं वैयक्तिक मत आहे. मराठीत बोला, मराठीत का बोलत नाही म्हणत तुम्ही आपली असुरक्षितता दाखवत आहात. ते मराठी बोलतील किंवा न बोलतील पण त्यामुळे मराठी भाषेला काही नुकसान होणार आहे का? त्याने मराठी भाषेला भोकं पडणार आहेत का? नाही ना? तुम्ही स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात. पण त्यांना काहीच फरक पडत नाही. कोणाच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही.
दरम्यान, केतकी चितळे हिने केलेल्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात परप्रांतियांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामधून मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्यांना मराठीप्रेमींनी मारहाण केल्याचेही प्रकार घडले होते. आता केतकी चितळे हिने केलेल्या या विधानामुळे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.