प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. तिने 'फुलवंती' (Phulwanti Movie) सिनेमातून निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यावर प्राजक्ताने नुकतेच एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले.
प्राजक्ता माळी हिने नुकतेच प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने फुलंवती सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही, यावर आपले मत मांडले. तिने या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, याचे वाईट वाटत नसल्याचे म्हटले. आपले काय चुकले असेल, याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मला नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात मराठी माणूस सण समारंभामध्ये फार गुंततो. आमचा फुलवंती सिनेमा नवरात्रीच्या शेवटी आणि दिवाळीला सुरुवात होण्याच्या दरम्यान रिलीज झाला होता. मराठी माणूस एका सणांमधून बाहेर पडतो तेच दुसऱ्या सणामध्ये जातो. दिवाळीत तर आपण घराची साफसफाई करतो. त्यामुळे महिला घरात अडकून पडतात. तसेच सहामाही परीक्षादेखील असतात. याशिवाय त्याच्या पुढच्या महिन्यात निवडणुकादेखील होत्या. त्यामुळे नेतेमंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते त्या कामात व्यग्र होते.
'फुलवंती'ला अपेक्षित यश मिळालं नाही, म्हणून...
बरं त्या दिवशी चार-पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांनाही गर्दी होती. अशा विविध पातळ्यांवर ठरते. प्रेक्षकांना वेळ नसेल तर सिनेमा पाहायला कसे येणार. रिलीज डेटही तितकीच महत्त्वाची आहे. सर्वात शेवटी तुमचे नशीबही महत्त्वाचं असते. फुलवंतीला अपेक्षित यश मिळालं नाही, म्हणून अजिबात खंत वाटत नाही. पण पुढच्या सिनेमाच्या वेळी मराठी प्रेक्षकांच्या सोयीची तारीख निवडेन, असे या मुलाखतीत प्राजक्ताने म्हटले.