Join us

"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 11:25 IST

अनुपम खेर १० वी नापास झाले तेव्हा वडिलांनी का केलेलं सेलिब्रेशन? अभिनेत्याने सांगितला किस्सा

अनुपम खेर हे भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेते. अनुपम खेर यांना आपण कधी गंभीर, कधी विनोदी तर कधी खलनायकी भूमिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अनुपम खेर कायमच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे व्यक्त होत असतात. अशातच अनुपम यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अर्थात IFFI मध्ये त्यांच्या आयुष्यातील एक वेगळा किस्सा सांगितलाय. अनुपम यांना वडिलांकडून कोणती शिकवण मिळाली याचा खुलासा यामध्ये होतो.

अनुपम यांनी सांगितला वडिलांचा खास किस्सा

अनुपम खेर यांनी त्यांच्या वडिलांचा एक खास किस्सा IFFI मध्ये सांगितला. हा किस्सा अनुपम खेर यांच्या शालेय शिक्षणासंबंधी आहे. अनुपम खेर यांनी १० वीची परीक्षा दिली होती. पुढे त्यांना ११ वीत प्रवेश मिळाला. त्याकाळी शाळा ही निकालाची वाट न बघता विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत टाकायची. पुढे एखादा  मुलगा नापास झाला तर पुन्हा त्याला मागच्या इयत्तेत अर्थात १० वीमध्ये प्रवेश मिळायचा. अनुपम खेर यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं.

अनुपम १० वी नापास झाले अन्...

एकदा अनुपम यांचे वडील शाळेत आले अन् लेकाला एका चांगल्या हॉटेलमध्ये खायला घेऊन गेले. अनुपम यांचे वडील केवळ खास प्रसंगी कुटुंबाला असं हॉटेलला घेऊन जायचे. आपला मुलगा १० वीत नापास झालाय हे कळूनही अनुपम यांच्या वडिलांनी हे सेलिब्रेशन केलं. अपयशाचाही आनंद कसा साजरा करावा, याची खास शिकवण अनुपम यांच्या वडिलांनी त्यांना दिली. याशिवाय कठीण परिस्थितीतही स्वतःला सक्षम कसं ठेवायचं, हेही अनुपम वडिलांकडून शिकले.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूड