Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचा वाजणार 'डंका'?; शाहरूख-प्रभास प्रथमच आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 08:10 IST

'डंकी' आणि 'सालार : पार्ट १ सीझफायर' या दोन चित्रपटांमध्ये बिग बजेट आणि दिग्गज अभिनेते याखेरीज फारसे साम्य नाही.

संजय घावरे

मुंबई - सलमान खानच्या 'टायगर ३'ने दिवाळीला फटाके वाजवल्यानंतर 'डंकी' आणि 'सालार' दोन मोठे सिनेमे रसिकांना  'मेरी ख्रिसमस' म्हणण्यासाठी येणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खान आणि प्रभास प्रथमच आमनेसामने उभे ठाकणार आहेत. दोघेही सुपरस्टार असले तरी प्रभासला एका सुपरहिटची नितांत गरज आहे, तर शाहरुखने यंदा दोन ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत.

'डंकी' आणि 'सालार : पार्ट १ सीझफायर' या दोन चित्रपटांमध्ये बिग बजेट आणि दिग्गज अभिनेते याखेरीज फारसे साम्य नाही. आजवर 'मुन्नाभाई एमबीबीएस', '३ इडियट्स', 'पीके', 'संजू' असे सुपर डुपरहिट सिनेमे देणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी 'डंकी'चे दिग्दर्शन केल्याने या चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 'उग्रम'सोबतच 'केजीएफ १' आणि 'केजीएफ २' या दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रशांत नील यांनी 'सालार'चे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे दोन बड्या दिग्दर्शकांच्या सिनेमांमध्येही या निमित्ताने टक्कर होणार आहे. 'डंकी'च्या तुलनेत 'सालार'चे बजेट खूप जास्त आहे. 'डंकी'चे बजेट १२० कोटी रुपये आहे, तर 'सालार'वर ४०० कोटी रुपयांचा डाव लावण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांची वनलाईन खूप वेगळी आहे. कॉमेडी ड्रामा असलेला 'डंकी' आंतरराष्ट्रीय अवैध स्थलांतरांवर आधारलेला आहे. मूळ तेलुगू भाषेत बनलेला 'सालार' मात्र टिपिकल साऊथ इंडियान अॅक्शन थ्रिलर आहे. यात धडाकेबाज अॅक्शन पाहायला मिळेल. 'डंकी' आपल्या ठरलेल्या तारखेला रिलीज होणार आहे, पण 'सालार'ने वारंवार प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या आहेत. दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये केवळ २४ तासांचे अंतर आहे. 'डंकी' २१ डिसेंबरला, तर 'सालार' २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

रसिकांचा कौल कोणाला?या दोघांपैकी प्रेक्षकांचा कौल कोणाला मिळतो आणि ते कोणता सिनेमा पाहण्याला प्राधान्य देतात हे एक वेगळेच कोडे आहे. 'सालार'ला दक्षिणेकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल यात शंका नाही, पण उर्वरीत भारतासह जगभर 'डंकी' पाहण्यासाठी रसिक गर्दी करतील आणि याच चित्रपटाचा डंका वाजेल असा अंदाज चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

किसमें कितना है दम?शाहरुखच्या जोडीला तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईराणी, विक्रम कोच्छर, अनिल ग्रोव्हर, धर्मेंद्र, सतीश शाह, परिक्षीत साहनी, ज्योती व्येंकटेश असे दिग्गज कलाकार आहेत. 'सालार'मध्ये पृथ्वीराज सुकुमान, श्रुती हसन, जगपती बाबू, बॉबी सिम्हा, टिनू आनंद, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी आदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार प्रभासची साथ देणार आहेत.

टॅग्स :शाहरुख खानप्रभासबॉलिवूड