आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देशभरातील अनेक बांधव स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहे. अनेकजण भारताचं राष्ट्रगीत 'जन गण मन' गाऊन तिरंग्याला अभिवादन करत असतील. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं हे राष्ट्रगीत आज देशाचा मानबिंदू आहे. पण तुम्हाला माहितीये का? भारताचं राष्ट्रगीत अर्थात 'जन गण मन' पहिल्यांदा कोणी आणि कधी गायलं होतं. जाणून घ्या हा खास किस्सापहिल्यांदा कोणी आणि कधी गायलं राष्ट्रगीत?
'जन गण मन' हे राष्ट्रगीत पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी कोलकाता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिले होते. त्यावेळी याचं नाव "भारतो भाग्यो विधाता" असं होतं. या कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष बिशन नारायण धर उपस्थित होते. सरला देवी यांनी त्यांच्या सुरेल स्वरांनी या गीताला सजवलं होतं. सरला देवी या गुरुदेव टागोरांच्या भाची होत्या.
गीताचा स्वर अल्हैया बिलावल रागात बसवले गेला होता. यातील पहिलं कडवं नंतर भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आलं. त्या काळी हे गाणं ऐकताना उपस्थितांना देशभक्तीचा एक वेगळा अनुभव मिळाला. गाण्याचा आशय भारताच्या विविध राज्यांमधील एकता आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना असा आहे. हे गीत पहिल्यांदा तात्त्वबोधिनी पत्रिका या मासिकात छापून आले. नंतर हळूहळू हे संपूर्ण भारतात लोकप्रिय झालं. स्वातंत्र्यलढ्यातही या गाण्यामुळे लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण केली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर १४ ऑगस्ट १९४७ रोजी संविधानसभेच्या अधिवेशनात हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी 'जन गण मन'ला अधिकृतपणे भारताचं राष्ट्रीय गीत घोषित करण्यात आलं. आजही प्रत्येक राष्ट्रीय सोहळ्यात हे गीत वाजवलं जातं आणि लोक उभं राहून आदर व्यक्त करतात. हे गीत भारताच्या ऐक्याचं, अभिमानाचं आणि देशभक्तीचं प्रतीक मानलं जातं. रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द भारतीयांच्या मनात आजही देशप्रेम जागृत करतात.