Shriya Pilgaonkar on marriage: सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर वेबसीरिज क्वीन आहे. अनेक सुपरहिट वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. नुकतीच ती 'मंडला मर्डर्स' सीरिजमध्ये दिसली. श्रिया ३६ वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. तिला अनेकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो. नुकतंच तिने यावर मत व्यक्त केलं आहे.
'युवा'युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रिया पिळगावकर म्हणाली, "गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत आहेत. पण यावर उत्तर द्यायचा माझ्यावर कधीच दबाव नव्हता. माझ्या आईवडिलांना ही पूर्ण कल्पना आहे की जेव्हा मला असा मुलगा भेटेल ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकते तेव्हा मी लग्न करेन. हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलं आहे."
ती पुढे म्हणाली, "माझे आईवडील नेहमी मला हेच म्हणतात की तुला लग्न करायचंच नसेल तरी आम्ही पाठिंबा देऊ. पण जर तुला लग्न करायचं असेल तर असं समजू नको कोणीतरी मुलगा अचानक नाट्यमयरितीने तुझ्यासमोर येऊन उभा राहील. हे फक्त सिनेमातच चांगलं वाटतं. जर असं काही आपोआप झालं नाही तर तुलाही थोडे प्रयत्न करावे लागतील. तर त्यांनी मला विचारलं की तु तसे प्रयत्न करत आहेस का?' यावर श्रिया हसली. पुढे म्हणाली, "अनेकदा लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रयत्न करत नसता तेव्हा अचानक तुम्हाला कोणीतरी भेटतं. त्यामुळे मी नेहमी खाली पाहूनच चालते. म्हणजे मी त्याचा शोध घेतच नाहीये अशा आविर्भावात मी चालते."