शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शशांकने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीबरोबरच हिंदी वेब सीरिजमध्येही शशांक झळकला आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुनाह' या वेब सीरिजमध्ये शशांक दिसला होता. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र अद्याप शशांकला त्यांच्या पहिल्या सीझनच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
'गुनाह' वेब सीरिजचा पहिला सीझन ३ जून २०२४ ला प्रदर्शित करण्यात आला होता. या वेब सीरिजमध्ये गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती, झयान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर शशांक महत्त्वाच्या भूमिकेत होता. पण, दुसऱ्या सीझनचे शूटिंग संपूनही पहिल्या सीझनचे पैसे न मिळाल्याने शशांकने नव्या सीझनचे डबिंग न करण्याचा निर्णय घेतला. पण, शशांकला पैसे न देता दुसऱ्या आर्टिस्टकडून त्याच्या भूमिकेचं डबिगं करून घेण्यात आलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शशांकने असं म्हटलं आहे.
शशांक केतकरची पोस्ट
"गुनाह सीझन २ आज पासून सुरू पण...सीझन २चं शूटिंग संपलं होतं तरी सीझन १ चे पैसे परवा पर्यंत मिळाले नव्हते. आणि सीझन १चे पैसे मिळाल्याशिवाय सीझन २चं मी डबिंग करणार नाही अशी कंडिशन घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करून घेतली आहेत", असं शशांकने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्याने निर्मात्यांना टॅगही केलं आहे.
'गुनाह सीझन २' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक याआधी 'स्कॅम २००२' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला' या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. सध्या शशांक 'मुरांबा'मधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.