शाहरुख खान आणि सलमान खान (Salman Khan) यांचा आयकॉनिक सिनेमा 'करण अर्जुन'. राकेश रोशन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात आहे. कधीही टीव्हीवर लागला तरी अनेकजण हमखास पाहतातच. सिनेमातील डायलॉग, गाणी सगळंच खूप गाजलं. नुकतीच नेटफ्लिक्सवर 'द रोशन्स' ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत रोशन कुटुंबासोबतच्या त्यांच्या आठवणी सांगितल्या. शाहरुख खानही यामध्ये दिसला. मात्र सलमान खान गायब होता. याचं कारण राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी नुकतंच सांगितलं.
'द रोशन्स' (The Roshans) डॉक्युमेंटरी पाहिल्यावर सलमान खान दिसला नाही म्हणून अनेकांनी प्रश्न विचारले. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले, "मी सलमानला फोन केला होता. पण तो त्याच्याच अडचणीत अडकला होता. म्हणून त्याला येणं शक्य झालं नाही. त्याला खरं तर यायची खूप इच्छा होती. त्याने तारखाही दिल्या होत्या पण ऐनवेळेस त्याने रद्द केलं. तो कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे आपण बघतच आहोत. आम्हाला सर्वांनाच त्याची आठवण आली. तो आला असता तर आणखी गप्पा झाल्या असत्या आणि करण अर्जुनच्याही आठवणींना उजाळा देता आला असता."
१९९५ साली 'करण अर्जुन' सिनेमा आला होता. सिनेमाला ३० वर्ष झाली. नुकताच सिनेमात थिएटरमध्ये रिरिलीज करण्यात आला होता. या सिनेमाच्या शूटिंगवेळी हृतिक रोशन लहान होता. त्याने वडिलांसोबत मिळून सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं.
सलमान खानला गेल्या काही काळापासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. तसंच तो 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.