ओटीटीवरील सर्वांची आवडती वेबसीरिज म्हणजे 'पंचायत' (Panchayat). या सीरिजचा मोठा चाहतावर्ग आहे. सीरिजमधील कलाकारांचा अभिनय, गावाची कहाणी सगळंच भन्नाट आहे. सचिवजी आणि रिंकीची लव्हस्टोरीही हळूहळू फुलत आहे. नुकतंच सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये दोघं जवळ आलेले दिसले. खऱ्या आयुष्यातही जितेंद्र कुमार(Jitendra Kumar) आणि सानविका (Sanvikaa) डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. सानविकाच्या एका उत्तरावरुन या चर्चांना उधाण आलं आहे.
'पंचायत'च्या चौथ्या सीझननिमित्त कलाकारांनी अनेक मुलाखती दिल्या. मंजू देवी, सचिवजी, प्रल्हाद, विनोद, रिंकी, भूषण कुमारसह प्रत्येक कलाकाराने संवाद साधला. एका मुलाखतीत रिंकी म्हणजेच अभिनेत्री सानविकाला विचारण्यात आलं की, 'फुलेरा गावातील शूट संपल्यानंतर पुन्हा शहरात येताना गावातून काय घेऊन यावं वाटतं?' यावर सानविका म्हणते, 'सचिवजी'. सानविकाच्या या उत्तरानंतर बाजूलाच बसलेला जितेंद्र कुमार खुदकन लाजतो.
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
सानविकाच्या या उत्तरावरुन सध्या दोघांच्या रिलेशनशिपमचीच चर्चा रंगली आहे. दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याचा अनेकांना अंदाज आहे. जर हे खरं असेल तर त्यांचे चाहते नक्कीच खूप खूश होतील. मात्र दोघांनी कधीच रिलेशनशिपची कबुली दिलेली नाही. सीरिजमध्ये त्यांची केमिस्ट्री खूप गाजली. त्यांचे व्हिडिओ, मीम्स तुफान व्हायरल होत असतात. सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये सानविका थेट शेवटी काही सेकंदांसाठी दिसली होती. दुसऱ्या सीझनपासून तिची भूमिका चांगली रंगवली गेली.
पंचायत सीझन ५ ची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. सीझन ४ मध्ये फुलेरा गावात निवडणूक होते. यामध्ये प्रधानची म्हणजेच रिंकीचे वडील पराभूत होतात. बनराकस आणि क्रांती देवी यांचा विजय होतो. तर दुसरीकडे प्रल्हाद ला थेट खासदारकीची ऑफर मिळते. सचिवजी आणि रिंकी यांची लव्हस्टोरीही आणखी पुढे गेलेली आहे. त्यामुळे पाचव्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता आहे.