अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांची सर्वात गाजलेली वेब सीरिज म्हणते 'द फॅमिली मॅन'. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी सगळेच वाट पाहत आहेत. अॅमेझॉन प्राईमने तिसऱ्या सीझनची घोषणाही केली आहे. मुख्य भूमिकेत असलेले मनोज वाजपेयी एका सीझनसाठी २० कोटी रुपये घेत आहेत. दरम्यान मनोज वाजपेयींचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी जितके पैसे मिळाले पाहिजे तितके मिळत नाहीत असं वक्तव्य केलं होतं.
'अनफिल्टर्ड विद समदिश' पॉडकास्टमध्ये मनोज वाजपेयी म्हणालेले की, "माझ्याजवळ पैसा नाही. कोणीही भोसले आणि गली गुलियां सारखे सिनेमे करुन श्रीमंत होत नाही.' समदिशने त्यांना विचारलं की, 'फॅमिली मॅनसाठी तुम्हाला शाहरुख, सलमानला मिळतं तेवढं मानधन मिळत नाही?' यावर मनोज वाजपेयी म्हणतात, "नाही. हे ओटीटी प्लॅटफॉर्मवाले नेहमीच्या निर्मात्यांपेक्षा कमी नाहीत. तेही पैसे देत नाहीत. ना ते कोणा स्टार ला आणतात आणि ना त्यांना भरभरुन पैसे देतात. फॅमिली मॅनसाठीही मला काही फार पैसे मिळत नाहीत. हे लोक पैसे देत नाहीत. काय होतं ना, एखाद्या गोऱ्याने सीरिज केली तर त्याला हे लोक पैसे देतील. जे ब्रँड असतात ते चीनमध्ये फॅक्ट्री का सुरु करतात? कारण तिथे कमी पैशात काम करणारे मजूर असतात. तेच जर जॅक रयानला घेतलं तर त्याला भरपूर पैसे देतील. तसंच आम्ही त्यांच्या लेखी मजूरच आहोत."
मनोज वाजपेयी यांना 'सत्या', 'गँग्स ऑफ वासेपूर' अशा अनेक सिनेमांमुळे लोकप्रियता मिळाली. त्यांनी आपल्या अभिनयाने स्वत:ला सिद्ध केलं. प्रभावी अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र त्यांना आणि त्यांच्यासारख्या इतरही प्रभावी अभिनेत्यांना कधीच स्टार असा दर्जा मिळाला नाही जो शाहरुख-सलमान सारख्या अभिनेत्यांना मिळाला. या मुद्द्यावरुन अनेकदा चर्चा होत असते.