Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू भरपूर समोसे खा!", इम्तियाज अली परिणीती चोप्राला असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:54 IST

'अमर सिंह चमकिला' साठी दिग्दर्शक इम्तियाज अलींनी अभिनेत्री परिणीती चोप्राला समोसे खाण्याचा सल्ला का दिला? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

'अमर सिंह चमकिला' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांची कहाणी दिसणार आहे. सिनेमात दिलजीत दोसांज अमर सिंह यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय सिनेमात परिणीती चोप्रा अमरज्योत कौर यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी परिणीतीला भरपूर खाण्याची सुट दिली होती. काय होतं त्यामागचं कारण?

'अमर सिंह चमकिला' च्या ट्रेलर लॉंचवेळी इम्तियाज म्हणाला, "या सिनेमासाठी परिणिती ही माझी पहिली निवड होती. मी जेव्हा परिला भेटलो तेव्हा ती म्हणाली, 'मी गाता येईल असा चित्रपट करण्यासाठी पाच वर्षांपासून वाट पाहत आहे'. मी म्हणालो 'मग हा असा चित्रपट आहे'. आणि मग परिणीतीने होकार दिला आणि मलाही आनंद झाला. सिनेमा करताना मला लक्षात आलं की, अमरज्योत यांच्या चेहऱ्याशी परिणीतीचा चेहरा मिळताजुळता आहे."

 इम्तियाज अलींनी पुढे खुलासा केला, "मग मी परिणीतीला सांगितलं की तू समोसे, मलई आणि इतर चाट खाणं सुरु कर. तुला १० किलो वजन वाढवावं लागेल." दिग्दर्शकाने दिलेल्या सूचना परिणीतीने पाळल्या. आणि अमरज्योत कौर यांच्या भूमिकेसाठी वजन वाढवलं. परिणीती, दिलजीत यांचा 'अमर सिंह चमकिला' सिनेमा १२ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

 

टॅग्स :परिणीती चोप्रादिलजीत दोसांझइम्तियाज अलीपंजाब