'पंचायत' वेबसीरिज ही सर्वांच्या मनाच्या जवळ आहे. या वेबसीरिजने हलक्याफुलक्या विषयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंय. 'पंचायत'चे तीनही सीझन चांगलेच गाजले. २०२३ मध्ये आलेला 'पंचायत'चा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता सर्वांना उत्सुकता आहे 'पंचायत'च्या चौथ्या सीझनची. 'पंचायत ४'चं शूटिंग सध्या सुरु आहे. अशातच सेटवरील बॉलिवूडचे शहनशाहअमिताभ बच्चन यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अमिताभ 'पंचायत'च्या सेटवर का पोहोचले, याचं कारण समोर आलंय.
'पंचायत ४'मध्ये दिसणार अमिताभ बच्चन?
TVF या निर्मिती संस्थेने 'पंचायत ४'च्या सेटवरील फोटो शेअर केलेत. या फोटोत अमिताभ बच्चन 'पंचायत ४'मधील कलाकारांशी संवाद साधताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रल्हाद चाचा, विकास आणि विधायक जी पाहायला मिळत आहेत. अनेकांना वाटलं की 'पंचायत ४'मध्ये अमिताभ बच्चनही दिसणार का? तर असं नाही. 'पंचायत ४'च्या सेटवर अमिताभ बच्चन का गेले होते? याचा खुलासा करण्यात आलंय.
या कारणाने बिग बी पोहोचले फुलेरामध्ये
आजकाल फ्रॉड कॉल करुन लोकांना फसवण्याचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं प्रमाण वाढत चाललंय. सायबर जनजागृतीविषयी भारत सरकारच्या एका जाहिरातीसाठी अमिताभ 'पंचायत ४'च्या सेटवर गेले होते. तिथे त्यांनी 'पंचायत'मध्ये विधायकाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज झा यांच्यासोबत शूटिंग केलं. याशिवाय सेटवरील इतर कलाकारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. 'पंचायत ४' वेबसीरिजचं सध्या शूटिंग सुरु असून ही सीरिज पुढील वर्षी २०२६ मध्ये भेटीला येण्याची शक्यता आहे.