विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेत्यांपैकी एक आहे. टीव्ही ते मोठा पडदा असा त्याचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे. सुरुवातीला काही सिनेमांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारत तो आता लीड भूमिकांमध्ये झळकत आहे. '१२वी फेल' सिनेमामुळे विक्रांतला प्रचंड यश मिळालं. मात्र नंतर त्याने अचानक कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. यामागचं कारण म्हणजे त्याला कुटुंबाला वेळ द्यायचा होता. विक्रांत आणि पत्नी शीतल यांना एक मुलगा आहे जो एक वर्षाचा झाला आहे. विक्रांतने आज पहिल्यांदाच चाहत्यांना लेकाचा चेहरा दाखवला.
गेल्या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी विक्रांत मेस्सीची पत्नी शीतल ठाकुरने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव 'वरदान' असं ठेवलं गेलं. आज चिमुकल्या वरदानचा पहिला वाढदिवस आहे. विक्रांतने अगदी थाटामाटात लेकाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. इतकंच नाही तर त्याने वरदानचा चेहराही सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखवला आहे. विक्रांतने वरदानला कडेवर घेत काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. विक्रांत स्वत: सूटबूटमधअये तयार झाला आहे. तर ज्युनिअर विक्रांतही व्हाईट फॉर्मल शर्ट, पँट आणि शूज अशा लूकमध्ये आहे. तर शीतल फ्लोरल वनपीसमध्ये सुंदर दिसत आहे. या फोटोंसोबत विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिले, 'say hello! to onederful Vardaan'
'किती गोड आहे, अगदी विक्रांतसारखाच आहे' अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे. विक्रांत आणि शीतल २०१५ पासून एकमेकांना डेट करत होते. 'ब्रोकन बट ब्युटिफूल' वेबसीरिजच्या सेटवर ते भेटले. २०१९ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. तर १४ फेब्रुवारी २०२२ मध्ये ते लग्नबंधनात अडकले.
विक्रांतने सुरुवातीला टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तो 'बालिका वधू' या गाजलेल्या मालिकेतही दिसला. नंतर त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 'धूम मचाओ धूम' त्याचा पहिला सिनेमा. नंतर तो 'लुटेरा','दिल धडकने दो','हाफ गर्लफ्रेंड', 'छपाक', 'हसीन दिलरुबा' सिनेमांमध्ये दिसला. '१२th फेल' मुळे विक्रांतला कमालीचं यश मिळालं.