Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लेक असावी तर अशी'चा टीझर प्रदर्शित, पाहून 'माहेरची साडी' सिनेमाची येईल आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:38 IST

'माहेरची साडी' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके 'लेक असावी तर अशी' हा नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

९०च्या दशकातील सर्वाधिक गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे 'माहेरची साडी'. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. सुपरहिट ठरलेल्या काही मोजक्या मराठी सिनेमांपैकी 'माहेरची साडी' हा सिनेमा एक आहे. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आणि आजही हा सिनेमा टीव्हीवर पाहताना लक्ष्मीच्या यातना बघून बायका तितक्याच रडतात. 'माहेरची साडी' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके 'लेक असावी तर अशी' हा नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'लेक असावी तर अशी' सिनेमातून ज्योती या भूमिकेची कहानी दाखविण्यात येणार आहे. या सिनेमाच्या ५९ सेकंदाच्या टीझरमध्ये सुरुवातीला अल्लड ज्योतीची झलक पाहायला मिळत आहे. त्यानंतर सासरी तिचा छळ करण्यात येत असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. या टीझरमध्ये अनेक मराठी कलाकारांची झलकही पाहायला मिळत आहे. 'लेक असावी तर अशी' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर 'माहेरची साडी' सिनेमाची आठवण येते. या सिनेमाने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. 

'माहेरची साडी' सिनेमानंतर 'लेक असावी तर अशी' सिनेमातून विजय कोंडके नवी कोरी कथा घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. प्रेम, जिव्हाळा आणि भावनांनी पूरेपूर असलेला सुंदर फॅमिली ड्रामा कॉमेडीच्या तडक्यासहित प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या सिनेमात अभिनेत्री गार्गी दातार मुख्य भूमिकेत आहे. तर सुरेखा कुडची, यतिन कार्येकर, कमलेश सावंत, ओंकार भोजने, शुभांगी गोखले यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २६ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसिनेमासेलिब्रिटी