Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालन मोठ्या पडद्यावर साकारणार इंदिरा गांधी यांची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 13:21 IST

अभिनेत्री विद्या बालन आता लवकरच एक राजकारणी बनणार आहे.

मुंबई - अभिनेत्री विद्या बालन आता लवकरच एक राजकारणी बनणार आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी जरा थांबा. विद्या राजकारणी बनणार असल्याचं जरी खरं असलं तरीही ख-या आयुष्यात नाही तर मोठ्या पडद्यावर ती एका बड्या महिला नेत्याची भूमिका साकारणार आहे.  देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमामध्ये विद्या बालन मुख्य भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या बालनइंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.      

वरिष्ठ पत्रकार सागरिका घोष यांच्या  'इंदिरा, इंडियाज मोस्ट पावरफुल पीएम (Indira, India's Most Powerful PM)' पुस्तकावर आधारित सिनेमा बनवण्यासाठी सिद्धार्थ रॉय-कपूर यांनी पुस्तकाचे अधिकार घेतले आहेत. सिद्धार्थ रॉय-कपूर हे विद्या बालनचे पती आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात विद्या बालन इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सागरिका यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भातील माहिती पोस्ट करत म्हटले आहे की, ''सिद्धार्थ रॉय-कपूर आणि विद्या बालन प्रोडक्शनसोबत माझं पुस्तक 'इंदिरा, इंडियाज मोस्ट पावरफुल पीएम' च्या अधिकारासंदर्भात करार केले आहेत. या पुस्तकाच्या आधारे सिनेमा बनवण्याची त्यांची इच्छा आहे.''  

सागरिका घोष यांनी ट्विटदेखील केले आहे की, 'इंदिरा, इंडियाज मोस्ट पावरफुल पीएम' या माझ्या पुस्तकाच्या आधारे साकारण्यात येणा-या सिनेमामध्ये विद्या बालन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याबाबत मी फार उत्सुक आहे.  या ट्विटवरुन सागरिका यांनी एक प्रकारे विद्या बालन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याचा वृत्ताला दुजोरा दिल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर सागरिका घोष यांनी इंदिरा गांधी यांच्या पतीच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचं नावदेखील सुचवलं आहे. 

विद्या बालनच इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी योग्य असून अक्षय कुमारदेखील फिरोज गांधी यांच्याप्रमाणे दिसत असल्याचं ट्विटदेखील सागरिका यांनी केले आहे.   दरम्यान, विद्या बालन मोठ्या पडद्यावर इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार की नाही? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अधिकृत वृत्त येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  

टॅग्स :विद्या बालनइंदिरा गांधी