Chhaava To Release In Russia: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारीत 'छावा' (Chhaava) हा हिंदी चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) साकारली आहे. मराठा महाराणी येसुबाई (Maratha Maharani Yesubai) यांच्या भूमिकेत मूळची दक्षिणेतली असलेली रश्मिका मंदाना आहे. येत्या १४ फेब्रुवारीला तो प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा जगभर पोहोचणार आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे 'छावा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर रिलीज करणार आहेत. हा चित्रपट भारताबरोबरच रशियातही रिलीज केला जाणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनं याबाबत माहिती दिली आहे. एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, "विकी कौशल, रश्मिका, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'छावा' १४ फेब्रुवारी २०२५ रोजी भारत आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रदर्शित होण्याबरोबरच एकाच वेळी रशियामध्येही प्रदर्शित होणार आहे. याचं अधिकृत पोस्टर रिलीज करण्यात आलंय".
ज्वलंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गाथा जगातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांपर्यत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचा मोठा पडदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 'छावा' सिनेमात बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीला अनेक मराठी कलाकारदेखील दिसणार आहे. अभिनेता सुव्रत जोशी, संतोष जुवेकर, आशिष पाथोडे आणि शुभंकर एकबोटे हे 'छावा' मध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.