'बेबी जॉन' सिनेमाची गेले वर्षभर खूप चर्चा होती. २०२३ मध्ये शाहरुख खानचा 'जवान' सिनेमा आलेला तेव्हाच 'बेबी जॉन'चा पहिला टीझर सर्वांच्या भेटीला आला. त्यानंतर या वर्षात 'बेबी जॉन' विषयी अनेक ठिकाणी बोललं गेले. सिनेमाची गाणी अन् ट्रेलरचीही चांगलीच चर्चा झाली. सिनेमा ख्रिसमसच्या मुहुर्तावर २५ डिसेंबरला रिलीज झाला. 'बेबी जॉन'ची चार दिवसांची कमाई समोर आली असून वरुण धवनचा हा सिनेमा फ्लॉप झाल्याचं दिसतंय.
'बेबी जॉन'कडे प्रेक्षकांची पाठ
ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या 'बेबी जॉन'कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसून आली. सैकनिल्कने दिलेल्या आकड्यांनुसार 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी ११.२५ कोटींची कमाई केली. परंतु दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सिनेमाने अवघ्या ४.७५ आणि ३.६५ कोटींची कमाई केली. शनिवारी सिनेमाने अवघ्या ४.२५ कोटींची कमाई केली. त्यामुळे चार दिवसात 'बेबी जॉन' सिनेमाने अवघ्या २३.९० कोटींची कमाई केलीय. कमाईचे आकडे बघता 'बेबी जॉन'कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसतेय.
'बेबी जॉन' विषयी सांगायचं तर
प्रचंड गवगवा आणि चर्चा होऊनही 'बेबी जॉन'ला अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करता आली नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे डिसेंबरमध्ये रिलीज झालेला 'पुष्पा २' अजूनही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादात सुरु आहे. 'पुष्पा २'च्या कमाईच्या वादळात 'बेबी जॉन'च्या पदरी निराशा आली असं बोललं जातंय. या सिनेमात वरुण धवनसोबत किर्ती सुरेश, वामिका गब्बी, राजपाल यादव या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सलमान खानचा कॅमिओ सिनेमात दिसलाय.