मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) अलीकडे दिलेल्या मुलाखतींमुळे चर्चेत आहेत. विविध नाटके, मालिका आणि धाटणीच्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या वंदना त्यांच्या दिलखुलास आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी सुद्धा ओळखल्या जातात. नुकत्याच एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नुकतेच अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. तिथे त्यांनी त्यांच्या सिनेकारकीर्द आणि खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या आठवणींनाही उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरेंचा वंदना गुप्तेंवर खूप जीव होता. ते त्यांना भूत संबोधायचे. त्यांनी कधीच त्यांचं नाव घेतलं नाही, असं अभिनेत्रीनं सांगितलं. वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, ''माझ्या आईला क्रिकेटची खूप आवड होती, त्यामुळे आम्ही सामना पाहायला जायचो. एकदा मला बाळासाहेब दिसले आणि मी त्यांच्या हाताला धरून थेट पॅव्हिलियनमध्ये गेले आणि त्या दिवसापासून मला क्रिकेटचं वेड लागलं.''
''बाळासाहेब नेहमीच कलाकारांची काळजी घ्यायचे..''
बाळासाहेबांचं कलाकारांवर खूप प्रेम होतं. याबद्दल वंदना गुप्ते म्हणाल्या की, ''बाळासाहेब नेहमीच कलाकारांची काळजी घेत असत. मदतीसाठी कोणी काही विचारलं, तर त्यांनी कधीच नकार दिला नाही. माझ्या आईच्या नावाने एका बागेचं उद्घाटन करताना ते स्वतः आले होते आणि निधीही दिला होता. त्यांच्या शेवटच्या दिवसातील काही फोटो माझ्याकडे आहेत. अगदी शेवटच्या ४-५ दिवसांपूर्वीचे फोटो. त्यांच्यासोबत फार घरगुती नाते होते. असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही. महाराष्ट्रासाठी इतकं प्रेम असलेला दुसरा कोणी होणार नाही.''