संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला 'वास्तव' सिनेमा आठवत असेलच. हा सिनेमा संजय दत्तच्या करिअरला कलाटणी देणारा सिनेमा ठरला. 'वास्तव'मध्ये संजय दत्तने साकारलेली रघूची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. पचास तोला, पावभाजीची गाडी अशा 'वास्तव'मधल्या सर्वच गोष्टी लोकप्रिय झाल्या. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता 'वास्तव'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 'वास्तव'च्या सिक्वलची जोरदार तयारी असल्याचं दिसतंय. जाणून घ्या.
'वास्तव २'ची तयारी सुरु?
संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या 'वास्तव' सिनेमाच्या सिक्वलची तयारी सध्या महेश मांजरेकर करत असल्याचं दिसतंय. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, 'वास्तव'चा सिक्वल हा स्टोरीचा पुढचा भाग नसेल तर 'वास्तव २'मध्ये वेगळी स्टोरी दिसणार आहे. मूळ स्टोरीची थिमलाइन पकडून 'वास्तव २' तयार केला जाणार आहे. सिक्वलमध्ये संजय दत्त पुन्हा एकदा रघूच्या भूमिकेत दिसेल. एक नवीन आयडिया आणि एक नवीन कथा घेऊन 'वास्तव २'ची निर्मिती करण्यात येणार आहे.
'वास्तव २'मध्ये दिसणार नवीन कलाकार?
संजय दत्तच्या 'वास्तव २'मध्ये कलाकारही नवीन दिसणार असल्याचं बोललं जातंय. संजय दत्त पुन्हा एकदा रघूची भूमिका साकारणार हे निश्चित झालंय. परंतु यावेळी संजूबाबासोबत नवीन कलाकार दिसणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर नवीन अभिनेते आणि अभिनेत्रींचा शोध घेत आहेत. सध्या तरी सर्व बोलणी प्राथमिक स्तरावर असून महेश मांजरेकर कथा आणि पटकथेवर काम करत आहेत.