टीव्हीवरील गाजलेली मालिका 'उतरन' (Uttaranआठवतेय? २००८ साली आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. तपस्या आणि इच्छा या दोन मुलींची ती गोष्ट होती. सुरुवातीला या भूमिकांमध्ये दोन बालकलाकार झळकल्या होत्या. त्यातलीच दोन वेण्या, छोटा फ्रॉक घातलेली इच्छा म्हणजेच स्पर्श खानचंदानी (Sparsh Khanchandani) आता मोठी झाली आहे. नुकतीच ती 'सीआयडी २' मध्ये दिसली. तिला पाहून चाहत्यांना 'उतरन' मालिकेचीच आठवण झाली.
स्पर्श खानचंदानी तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर दिसत आहे. तिने टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'सीआयडी'च्या दुसऱ्या भागातून कमबॅक केलं आहे. यामध्ये ती इंन्सपेक्टर अभिजीतच्या मुलीच्या श्रेयाच्या भूमिकेत दिसत आहे. ती अभिजीतला जेलमध्ये भेटायला जाते. एकमेकांना पाहून दोघंही भावुक झालेले दिसतात. स्पर्शच्या चेहऱ्यावर आजही १६ वर्षांपूर्वीच्या त्या इच्छा सारखाच निरागसपणा दिसून येतोय. तरी तिचा लूक आता पूर्ण बदलला आहे. छोटे केस, ग्लॅमरस लूक अशा अंदाजात ती दिसत आहे. १९९८ पासून सुरु असलेल्या 'सीआयडी'चा आता भाग दोन आला आहे. २१ डिसेंबर पासून शो सुरु झाला आहे. पहिल्याच एपिसोडपासून शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे.
स्पर्श खानचंदानीने 'उतरन' मालिकेनंतर 'गुलाल', 'परवरिश', 'सीआयडी', 'नच के दिखा डान्स शो' आणि रोमँटिक ड्रामा 'दिल मिल गए' मध्ये भूमिका साकारली होती. याशिवाय ती 'मीना-हाफ द स्काय' आणि राणी मुखर्जीच्या 'हिचकी' सिनेमातही दिसली. यानंतर मात्र तिने अभिनयापासून ब्रेक घेत शिक्षणात लक्ष केंद्रित केलं. एलएलबीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता तिने 'सीआयडी २' मधून कमबॅक केले आहे.