उषा नाडकर्णी या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ताकदीच्या भूमिका साकारून त्या घराघरात पोहोचल्या. काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, उषा नाडकर्णी यांचं अभिनय क्षेत्रात काम करणं त्यांच्या आईला मात्र पसंत नव्हतं. त्यामुळेच अभिनयात काम करायचं असेल तर घराबाहेर जा, असं म्हणत त्यांना आईने घराबाहेर काढलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा उषा नाडकर्णी यांनी सांगितला.
उषा नाडकर्णी यांनी नुकतीच हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी बालपणापासून ते अभिनय क्षेत्रातील करिअरपर्यंत अनेक किस्से सांगितले. अभिनय क्षेत्रात येण्याआधी उषा नाडकर्णी या मुंबई महानगरपालिकेत कामाला होत्या. त्यानंतर त्यांनी काही वर्ष बँकेतही नोकरी केली. हे करत असतानाच त्या अभिनयाकडे वळल्या. पण, त्यांचं सिनेसृष्टीत येणं आईला मात्र पसंत नव्हतं. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "माझी आई शिक्षिका होती. तिला माझं अभिनयात काम करणं आवडायचं नाही".
"पण, एक आई म्हणून तिचं म्हणणंदेखील बरोबर होतं. मुलीचं लग्न होणारे, लोक काहीही बोलतात. शिवाय या इंडस्ट्रीत कामाची वेळ ठरलेली नसतेच. कधीही यायचं, कधी घरी जायचं. एक दिवस तर आईने माझे सगळे कपडे उचलून घराच्या बाहेर फेकून दिले. मला म्हणाली की आमच्या घरातून जा. नाटक करायचं असेल तर आमच्या घरात राहायचं नाही. मला पण राग आला होता. मी सगळे कपडे घेतले आणि जवळच असलेल्या माझ्यासोबत BMCमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीकडे गेले. तेव्हा मी १८-१९ वर्षांची असेन. त्यानंतर ७ दिवसांनी मी घरी परतले होते", असा किस्सा उषा नाडकर्णी यांनी सांगितला.