Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:03 IST

लग्नानंतर मी वाकोल्याला गेले अन्... उषा नाडकर्णींनी नुकतीच दिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. खाष्ट सासू अशी त्यांची ओळख आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी ही भूमिका केली. आज वयाच्या ७९ व्या वर्षीही त्या त्यांच्या कामात सक्रिय आहेत. तरुणांना लाजवेल एवढं काम त्या करत आहेत. नुकतंच त्यांना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्येही पाहिलं गेलं. इथेही त्यांनी कित्येक तास उभं राहून विविध रेसिपी बनवल्या. उषा नाडकर्णी मुंबईत त्यांच्या घरी एकट्याच राहतात. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच लग्नावर भाष्य केलं होतं.

तीन वर्षांपूर्वी 'दिल के करीब' या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच लग्नावर भाष्य केलं होतं. त्या म्हणालेल्या की, "मी प्रेम वगरे केलं नाही. लव्ह मॅरेज केलं नाही...अरेंज मॅरेज केलं. आई वडिलांनीच मुलगा शोधला. कारण मला लग्नच करायचं नव्हतं. मला इंटरेस्टच नव्हता.(वैतागून म्हणाल्या) पण नंतर झालं लग्न...झालं सगळं."

तर आता नुकतंच सुमन मराठी म्युझिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "लहानपणी आम्ही १० बाय १० च्या खोलीत राहत होतो. नंतर दोन रुमच्या घरात शिफ्ट झालो. तिथून २ बीएचके मध्ये गेलो. मग माझं लग्न झालं आणि मी वाकोल्याच्या घाणेरड्या इमारतीत राहायला आले. थर्ड क्लास एरिया, सगळे झोपडपट्टीतले लोक. मी कधी तिथे कोणाला घरी बोलवलं नाही. मला फंक्शनला बोलवायला कोणी गाडी पाठवली तर मी त्यांना मेन रोडवरपर्यंतच यायला सांगायचे. त्यानंतर मी घर घेतलं. अशा मी सगळ्या पायऱ्या चढून इथपर्यंत पोहोचले. माणसं कमावता कमावता पैसे कमावणं महत्वाचं आहे. नुसता पैसा चालत नाही माणसंही असावी लागतात. मला स्वतंत्र राहायलाच आवडतं. मी कधी कोणावरही ओझं झाले नाही."

उषा नाडकर्णी यांना एक मुलगा आहे. अभिजीत नाडकर्णी असं त्याचं नाव आहे. उषा नाडकर्णी सतत कामात व्यग्र असल्याने त्यांच्या मुलाचा सांभाळ आई आणि भावानेच केला. आजही त्यांचा मुलगा बायको आणि मुलीसह मामीसोबत राहतो. तर त्यांचा मामा म्हणजेच उषाताईंच्या भावाचं गेल्यावर्षीच निधन झालं.

टॅग्स :उषा नाडकर्णीमराठी अभिनेतालग्न