उपासना सिंह (Upasana Singh) या अभिनेत्री आणि कॉमेडी भूमिकांमध्ये दिसणाऱ्या कलाकार आहेत. अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्या झळकल्या आहेत. तसंच 'कपिल शर्मा शो' मध्येही त्या दिसल्या आहेत. सध्या त्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. यात त्यांनी इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी मुलाखतीत केला. नक्की काय म्हणाल्या उपासना सिंह?
कास्टिंग काऊच हा प्रकार कोणत्याही क्षेत्रात दिसून येतोच. तसंच बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतही कास्टिंग काऊच होतं. ४९ वर्षीय अभिनेत्री उपासना सिंह यांनी नुकताच त्यांचा अनुभव सांगितला. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "एका मोठ्या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मला आणि अनिल कपूरला सिनेमासाठी साईन केलं होतं. मी नेहमीच दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जाताना आई किंवा बहिणीला सोबत घेऊन जाते. एक दिवस एका दिग्दर्शकाने मी नेहमी आईला सोबत घेऊन का येते असा प्रश्न विचारला. मग त्याने मला रात्री साडे अकरा वाजता 'सिटिंग'साठी एका हॉटेलमध्ये बोलवलं. मी एकदम खडसावून सांगितलं की मी उद्या सकाळी स्क्रीप्ट ऐकेन. माझ्याकडे आता यायला कारही नाही. मग त्याने मला विचारलं की 'तुला सिटिंगचा अर्थ कळला नाही का?' यानंतर मी पूर्ण रात्री झोपू शकले नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "दुसऱ्या दिवशी माझ्यातील सरदारनी जागी झाली. त्या दिग्दर्शकाचं ऑफिस बांद्रामध्ये होतं. मी सकाळीच तिकडे गेले. त्याची तीन-चार लोकांसोबत मीटिंग सुरु होती. सेक्रेटरीने मला बाहेर वाट बघायला सांगितली. मी तसं केलं नाही. मी सगळ आतमध्ये घुसले आणि सलग पाच मिनिट मी पंजाबीत शिव्या दिल्या. बाहेर आल्यावर मला लक्षात आलं की मी अनेकांना हे सांगितलेलं की मी अनिल कपूरसोबत सिनेमा करत आहे. फुटपाथवरुन चालक असताना मी फक्त रडत होते."