उदित नारायण हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक आहेत. आपल्या सुरेल आवाजाने ते गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. उदित नारायण यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ते राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीतून उदित नारायण सुखरूप बाहेर पडले आणि त्यांचे प्राण वाचले. मात्र या आगीत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
उदित नारायण राहत असलेल्या बिल्डिंगच्या दुसऱ्या विंगमध्ये ६ जानेवारीला आग लागली होती. सोमवारी रात्री बिल्डिंगमध्ये आग लागल्याने सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती उदित नारायण यांनी दिली. ते म्हणाले, "आम्ही खूप घाबरलो होतो. लिफ्ट बंद होती त्यामुळे आम्ही जिन्याने उतरलो. पण, तुमच्या आशीर्वादामुळे माझे प्राण वाचले". उदित नारायण या बिल्डिंगमध्ये ११व्या मजल्यावर राहतात.
"अंधार होता आणि आगीमुळे धूर झाला होता. त्यामुळे १०८ वर्षीय वृद्ध व्यक्तीला जिन्याने उतरवणं कठीण होतं. पण, ३-४ लोकांनी हे काम केलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती", असंही त्यांनी सांगतिलं. यामध्ये ७५ वर्षीय राहुल मिश्रा यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहितीही उदित नारायण यांनी दिली.