बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लाम शहजादचे वडील रुहुल अमीन यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नाही. माझा मुलगा आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीत कुठले साम्य नाही असं रुहुल अमीन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सैफ अली खानवरील हल्ला करणारा पकडलेला आरोपी तोच आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोपी शरीफुल इस्लामच्या वडिलांनी सांगितले की, सैफ अली खानच्या घरात हल्ला करून पळून जाणारा व्यक्ती सीसीटीव्हीत दिसला मात्र तो माझा मुलगा नाही. त्या व्यक्तीचे केस खूप लांब आहेत तर माझा मुलगा सैन्यातील जवानासारखं केस छोटे ठेवतो. शरीफुलने त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो बाईक रिक्षा चालवण्याचं काम करायचा असं त्यांनी सांगितले. रुहुल अमीन यांनी २००७ पर्यंत बांगलादेशातील खुलना इथं कारखान्यात काम केले होते. त्यानंतर ते गावाकडे परतून शेती करायला लागले.
सैफवरील हल्लेखोर बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर आलेत. मुंबई पोलिसांनी शरीफुलकडून बांगलादेशी आयकार्ड आणि वाहन चालवण्याचा परवाना जप्त केला आहे. त्यावर शरीफुल इस्लाम असं त्याचे नाव लिहिलंय. पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रात त्याच्या वडिलांचे नाव रुहुल अमीन असल्याचं समोर आले. रविवारी शरीफुल इस्लामला पोलिसांनी अटक केली होती. विजय दास असं नाव बदलून तो मुंबई बेकायदेशीरपणे राहत होता. मागील ५ महिन्यापूर्वी तो बांगलादेशातून आला होता.
शरीफुल एका हाऊसकिपिंग एजन्सीशी जोडला होता. बांगलादेशातून दावकी नदी पार करून त्याने भारतात घुसखोरी केली. काही काळ पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर तो मुंबईत नोकरीसाठी आला. एका स्थानिक व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर करून त्याने सिमकार्ड खरेदी केले. सध्या आरोपी मुंबई पोलिसांच्या तावडीत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपीचे कपडे, बॅग, मोबाईल फोन, सीसीटीव्ही फुटेज हे सर्व जप्त करण्यात आले आहे. बायोलॉजी, डिएनए, फुटप्रिंट्स, फिजिक्स, सायबरसारख्या विभागांचा पुराव्यांचे विश्लेषण करण्यासाठी मदत घेतली जात आहे. आरोपीची चौकशी करताना भाषेचा मोठा अडथळा येत आहे. तो चौकशीत बांगलादेशी शैलीत हिंदी बोलत आहे.
मुंबई पोलिसांनी खुलासा करावा - काँग्रेस
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे जाहीर केले आहे. परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही, असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.