बॉलिवूडचा ‘क्राईम मास्टर गोगो’ अर्थात शक्ती कपूर (Shakti Kapoor ) यांनी आपल्या फिल्मी करिअरमुळे 700 पेक्षा अधिक सिनेमात भूमिका साकारल्या. पण यापैकी बहुतांश सिनेमात त्यांच्या वाट्याला आला तो खलनायकाचाच रोल. याच खलनायकांच्या भूमिकांमुळे त्यांना ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील सिकंदरलाल कपूर. मग शक्ती हे नामकरण कसं झालं तर सुनील दत्त आणि नर्गिस यांनी त्यांना हे नाव दिलं होतं.
काय होता तो किस्सा...शक्ती कपूर यांनी सांगितलं की, ‘सत्ते पे सत्ता हा माझा पहिला कॉमेडी सिनेमा होता. राज सिप्पींनी कॉमेडी रोलसाठी मला विचारणा केली, तेव्हा मी काहीसा संभ्रमात होतो. माझे विलन्सचे रोल लोकांना आवडत होते. मग अचानक हे मला कॉमेडियन का बनवू इच्छित आहेत, असा प्रश्न मला पडला होता. यानंतर मी ‘मवाली’ केला. या चित्रपटाचा पहिला शॉट होता आणि कादर खान यांनी मला जोरदार थप्पड मारली. मी जमिनीवर कोसळलो. दुसऱ्याच शॉटमध्ये अरूणा इराणी यांनीही मला जोरदार मुस्काटात मारली. तेव्हाही मी जमिनीवर कोसळलो. तिसऱ्यांदाही असंच घडलं. हे सगळं पाहून मी अस्वस्थ होतो. माझं करिअर संपलं, असं मला त्याक्षणी वाटू लागलं होतं. ... हे सिनेमा दिग्दर्शित करत होते आणि कादर खानही चित्रपटात होते.
मी कादर खान यांच्याकडे गेलो आणि अक्षरश: त्यांच्या पायावर कोसळलो. मी तुमच्या पाया पडतो. प्लीज माझं आज संध्याकाळचं तिकिट बुक करून द्या. मला या चित्रपटात काम करायचं नाही. माझं करिअर संपलंय. अजून माझं लग्नही झालं नाही, असं काय काय मी त्यांना म्हणालो. यानंतर अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी मला समजावलं. तुला थपडा पडत असतील तर पडू देत, पण सिनेमा सोडून नकोस. यामुळे तुला नेम व फेम मिळेल, असं ते मलम्हणाले. वीरू देवगण फाईट मास्टर होते. त्यांचा शब्द खरा झाला. मवाली रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. या चित्रपटातील माझा रोल सर्वांनाच आवडला होता.’