२०२४ वर्ष सरत असताना नव्या मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. कित्येक मालिका नव्याने सुरू झाल्या आहेत. तर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीवर अलिकडेच 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका सुरू झाली आहे. तर तगडी स्टारकास्ट असलेली 'लक्ष्मी निवास' मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुला जपणार आहे' ही हॉरर मालिकादेखील सुरू होणार आहे. अशातच 'इच्छाधारी नागीण' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.
'इच्छाधारी नागीण' या मालिकेचा प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये भगवान शंकराची मूर्ती आणि पिंड दिसत आहे. दोन नाग एकमेकांसमोर येत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. "येतेय 'इच्छाधारी नागीण'...लवकरच आपल्या झी मराठी वर!", असं प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे. पण, या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते मात्र नाखूश असल्याचं दिसत आहे.
या प्रोमोवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी मालिकेला ट्रोल केलं आहे. "कलर्सच्या नागीणचा रिमेक", "नाव ऐकूनच बघायची इच्छा निघून गेली", "मौनी रॉयला घेऊन या", "चॅनेल न बघण्याचे झी मराठी कारण देत आहे", "त्यापेक्षा जुन्या मालिका चालू करा...टीआरपी पण वाढेल", "झी मराठीकडून ही अपेक्षा नव्हती" अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
'इच्छाधारी नागीण' या मालिकेत कोणते कलाकार असणार? इच्छाधारी नागीणची भूमिका कोण साकारणार? याबाबत अद्याप कोणतीही अपडेट नाही. ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचंही म्हटलं जात आहे.