राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी मतदारसंघांबाहेर रांगा लावल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावत चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) यानेदेखील मतदानाचा हक्क बजावला असून त्यासोबत त्याने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत भारतातील जनतेला सत्ताधाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा नमूद केल्या आहेत.
अभिनेता शशांक केतकर याने इंस्टाग्रामवर मतदान केल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यात दोन फोटो आहेत. त्यातील एका फोटोत भारतातील लोकांना सत्तेत येणाऱ्या राजकारण्यांकडून असलेल्या अपेक्षांबद्दल सांगितले आहे. फोटोवर त्याने लिहिले की, ऑफिशिएल भारतीय जनतेचा मेनिफेस्टो. राजकारण्यांसारखा प्रत्येकाकडे भरपूर पैसा. राजकारण्यांसारखा प्रत्येकाकडे गाड्या. राजकारण्यांसारखी प्रत्येकाची मोठी घरं. भारताची लोकसंख्या बघता शुद्ध हवा, शांतता, स्वच्छ परिसर, पाणी, खड्डे नसलेले मोठे रस्ते, शिक्षणाच्या उत्तम सोयी, उत्तम इस्पितळ, बागा, सुरक्षित समाज, शुन्य भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्क, हाताला काम २०२५ उजाडणार आहे. निदान या सामान्य कमीत कमी गोष्टी मिळाव्यात.
शशांकने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, मी माझा हक्क बजावला आहे. अधिकृत भारतीय असल्याला मला अभिमान आहे. राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला असला तरी उज्वल भविष्याची आणि उत्तम हिंदुस्थानाची अपेक्षा आहे. मत देऊन असे गप्प बसू नका. चांगल्या कामाचं कौतुक करा आणि चुकांचा निषेध करा! इथून पुढे राज्यकर्त्यांचा नाही, तर आपला जनतेचा कॉमन मिनिमन प्रोग्राम, मेनिफेस्टो असेल. पिढी बदलते आहे, सजग होते आहे… तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!