Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ मालिकेने पार केला 10 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:54 IST

‘स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेने आपल्या सुंदर व्यक्तिरेखा आणि कौटुंबिक मूल्यदर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात एक आगळे स्थान निर्माण केले आहे.

स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेने आपल्या सुंदर व्यक्तिरेखा आणि कौटुंबिक मूल्यदर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात एक आगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेच्या प्रसारणाला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे या मालिकेच्या कलाकार व कर्मचाऱ्यांमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. या मालिकेवर समाजाच्या सर्व थरांमधून प्रेम आणि प्रशंसेचा वर्षाव झाला असून तिने प्रेक्षकांच्या मनावर एक दीर्घ ठसा उमटविला आहे.

या दशकपूर्तीच्या यशाने आनंदित झालेला व मालिकेतील कार्तिक या नायकाची भूमिका रंगविणारा मोहसिन खान म्हणाला, “आमच्या मालिकेच्या प्रसारणाला चक्क 10 वर्षं झाली, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. या मालिकेने आता यशाचा आणखी एक टप्पा पार केला असून जसा काळ जाईल, तशी ही मालिका अधिकच विकसित होत चालली आहे. या मालिकेत भूमिका रंगवितानाचे अनुभव म्हणजे आयुष्यभर पुरतील अशा सुखद आठवणींचा साठा आहे.

इतक्या गुणवान तंत्रज्ञ आणि कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद आणि संपन्न होता. मला माझ्यातील अभिनेत्याची ओळख घडविण्याची आणि विविध छटा साकार करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी या मालिकेचा अतिशय आभारी आहे. इतकी वर्षं ज्या प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम आणि प्रशंसेचा इतका वर्षाव केला त्या सर्व प्रेक्षकांचाही मी अत्यंत ऋणी आहे.” 

स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ ही मालिका आता घरोघरी गेली असून दररोज ही मालिका पाहण्यासाठी लक्षावधी प्रेक्षक अतिशय उत्सुकतेने टीव्ही सुरू करतात. या प्रेक्षकांच्या आनंद, दु:ख आणि या साऱ्या भावना आता या मालिकेशी निगडित झाल्या असून ते या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या भावनांशी एकरूप झाले आहेत. ही मालिका यापुढेही अशीच जोरदार आगेकूच करण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस