Join us

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्यावर कोसळलं आर्थिक संकट; भाड्याच्या घरात रहायची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:31 IST

Tv actor: या अभिनेत्याला मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मालिका विश्वात 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतीये. त्यामुळे त्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकाला आपलासा झाला आहे. त्यामुळे या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्येच मालिकेतील ददाजी म्हणजेच अभिनेता संजय गांधी यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

संजय गांधी यांनी मालिकेत  महेंद्रप्रताप सिंघानिया म्हणजेच ददाजी ही बूमिका साकारली होती. सध्या ते मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. संजय गांधी (sanjay gandhi)  यांनी २००९ ते २०१२ या काळात 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत काम केलं.  सध्या ते 'झनक' या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने  त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कलाकारांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पर्सनल जीवनावर भाष्य केलं.

सध्या मी वाईट परिस्थितीमध्ये

"कलाकारांचं आयुष्य हे असंच असतं. जेव्हा ते काम करतात त्यावेळी सगळं व्यवस्थित असतं. पण, जेव्हा त्यांच्याकडे काम नसतं तेव्हा त्यांच्या हातून सगळं अचानक निघून जातं. सध्या मी एका मालिकेत काम करत असलो तरी सुद्धा मी वाईट परिस्थितीमधून जातोय. सुरुवातीला मी जेव्हा 'झनक' मालिकेत काम करायला सुरुवात केली त्यावेळी मला फक्त २० सीन शूट करायचे असल्याचं सांगितलं. त्यानंतर २ महिने ब्रेक असेल असं सांगितलं. त्यानंतर मग माझं पात्र मालिकेचा महत्त्वाचा भाग झालं पण गेल्या ९ महिन्यांपासून मी आतापर्यंत फक्त २० दिवसच शूट केलं आहे आणि आता पुन्हा माझा ट्रॅक सुरु होण्याची वाट पाहतोय. मला त्यांच्याकडून मे महिन्यापासून कोणतेही अपडेट मिळालेले नाही. जर त्यांना माझी गरज नसेल, तर ते मला थेट सांगू शकले असते. जेणेकरुन मला इतर प्रोजेक्टमध्ये काम करता आलं असतं".

भाड्याच्या घरात राहतोय अभिनेता

"एक अभिनेता म्हणून हे सगळं खूप कठीण आहे. मला या शहरात स्वत:ची ओळख जपण्यासाठी पैशांची गरज आहे. माझ्याकडे सध्या उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही. कोव्हिडच्या काळात माझं सेव्हिंगही संपलं. सध्या मी अंधेरीला भाड्याच्या घरात राहतोय आणि मला घरभाडे देण्यासाठीही मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागतायेत."

स्वत:चं घर ठेवणार गहाण

"माझं मीरा रोडला घर आहे ते मी गहाण ठेवण्याच्या विचारात आहे. कारण, सध्या मला पैशांची प्रचंड गरज आहे. मला एक नवीन प्रोजेक्ट हवा आहे. काही दिवसांपूर्वीच मी झलक मालिका सोडली. त्यामुळे नक्कीच पुढे काहीतरी चांगलं होईल याची आशा आहे."

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी