Join us

खेळण्यासाठी नव्हे तर व्हेकेशनला गेलो होतो असे सांगतायेत १९८३ चे वर्ल्ड कपविजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 12:49 IST

कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, कृष्णमाचारी श्रीकांत, रोजर बिन्नी, कीर्ती आझाद, मदन लाल, सय्यद किरमानी, बलविंदर संधू, यशपाल शर्मा हे सर्वजण वर्ल्ड कप मधील काही आनंदाचे क्षण कपिल शर्मा सोबत शेअर करणार आहेत.

ठळक मुद्देकीर्ती आझाद म्हणाले, "मी इंग्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत होतो, जेव्हा कपिलने माझी वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाल्याबद्दल सांगितले, मी लगेचच जिमीला (मोहिंदर अमरनाथ) फोन केला आणि म्हणालो, आपल्याला एक महिन्यासाठी यूकेला फिरायला जायची संधी मिळत आहे.

कपिल शर्मा शो या कार्यक्रमात या आठवड्यात काही खास गेस्ट येणार आहेत. १९८३ ला भारताला वर्ल्ड कप मिळवून देणारे कपिल देव आणि त्यांची टीम या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या संघातील मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, कृष्णमाचारी श्रीकांत, रोजर बिन्नी, कीर्ती आझाद, मदन लाल, सय्यद किरमानी, बलविंदर संधू, यशपाल शर्मा हे सर्वजण वर्ल्ड कप मधील काही आनंदाचे क्षण कपिल शर्मा सोबत शेअर करणार आहेत. कपिल शर्माने या संपूर्ण टीमसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. कपिलने या टीममधील सगळ्यांना वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे तयारी केली असे विचारले. पण या प्रश्नावर टीममधील सगळ्यांनी खूपच मजेशीर उत्तरं दिली. कपिल देव म्हणाले, "सुरुवातीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचता आले. पण अंतिम फेरीत आम्ही आश्चर्यकारकरित्या पोहोचलो. प्रत्येकजण अमेरिकेच्या प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत होते आणि त्यानुसार त्यांनी आपले कपडे देखील भरले होते. म्हणून आम्ही जेव्हा अंतिम फेरीत पोहचलो तो आनंद हा वेगळाच होता.” कीर्ती आझाद म्हणाले, "मी इंग्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत होतो, जेव्हा कपिलने माझी वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाल्याबद्दल सांगितले, मी लगेचच जिमीला (मोहिंदर अमरनाथ) फोन केला आणि म्हणालो, आपल्याला एक महिन्यासाठी यूकेला फिरायला जायची संधी मिळत आहे. माझे हे वाक्य ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल की, आम्ही वर्ल्ड कपसाठी तयारच नव्हतो. पण कपिल देव इतके समर्पित होते की त्यांच्यामुळे हा विजय शक्य झाला." यावर मोहिंदर अमरनाथ म्हणाले, "आम्ही मॅचेस  खेळण्याऐवजी विनामूल्य सुट्टी घालवण्यासाठी अधिक उत्साही होतो. परत परदेशात जाणे म्हणजे एक दुर्मिळ योग असणार होता आणि आम्हाला असेही सांगण्यात आले होते की, शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्याकडे तिकिटे आहेत आणि म्हणूनच आम्ही सर्व सुट्टीच्या मूडमध्ये होतो. 

संदीप पाटील यांना कडक शिस्त असणाऱ्या सुनील गावसकरसह आपली रूम शेअर करायची होती. संदीप पाटील सांगतात, "मला गावसकरांसोबत रूम शेअर करायची आहे असे व्यवस्थापकांनी सांगितल्यानंतर माझी अवस्था अतिशय वाईट झाली होती. गावस्कर हे अतिशय शिस्तप्रिय होते. त्यामुळे त्यांच्यासोबत राहायचे म्हणजे मला ही तसेच राहायला लागणार हा विचार करूनच मी घाबरलो होते. सुनील गावसकर रूममध्ये असताना नेहमीच वाचन करत असत अथवा झोपत असत. एकदा माझा एक मित्र मला भेटायला येत असल्याचे मला रिसेप्शनवरून फोन करून सांगण्यात आले. त्यावेळी मी विनम्रतेने सुनील यांना विचारलं की, माझा एक मित्र येत आहे. तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर थांबू शकता का? त्यावर मित्र येत आहे की मैत्रीण असे विचारत त्यांनी माझी चांगलीच टर उडवली आणि म्हणाले, मी बाहेर बसतो... एकदा तुझी मीटिंग पूर्ण झाल्यानंतर मला कॉल कर. सुनील यांच्यासोबत रूम शेअर करणं ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद बाब होती. पण काहीच दिवसांत त्यांची आई तिथे आल्यामुळे रवी शास्त्री यांच्यासोबत मला रूम शेअर करण्याबद्दल मला सांगण्यात आले. त्यावेळी मला प्रचंड आनंद झाला होता."

टॅग्स :द कपिल शर्मा शोकपिल देवकपिल शर्मा