गौरव मोरे हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. गौरवला आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून पाहिलं. या शोमधून गौरवला अमाप लोकप्रियता मिळाली. गौरवची विनोदाची हटके स्टाईल, त्याचं अचूक टायमिंग अशा सर्वच गोष्टींची चांगलीच चर्चा झाली. परंतु काही वर्षांपूर्वी गौरवने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला कायमचा रामराम ठोकला आणि त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अशातच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेने हास्यजत्रा का सोडली, याबद्दल खुलासा केला आहे...म्हणून मी हास्यजत्रेतून बाहेर पडलो
गौरव मोरे म्हणाला की, "कोरोना काळात हास्यजत्रेला लोकांनी खूप उचलून धरलं. मग आम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. ५ वर्ष काम केल्यानंतर अभिनयाबाबतीत, इतर गोष्टींबाबतीत माझ्याकडून तोचतोचपणा आला होता. कंफर्ट झोन आला होता. माझ्याकडून काहीही वेगळं घडत नव्हतं. ५ वर्ष झाली आहेत तर आपण स्वत:साठी ब्रेक घेतला पाहिजे असं वाटलं. तेव्हा मी तो ब्रेक घेतला. या दरम्यान 'मॅडनेस मचाएंगे' ही हिंदी मालिका केली. मधले काही वर्ष मी कोणताही कॉमेडी शो केला नाही."
"मी कार्यक्रम सोडणार हे कळल्यावर सर्वांनी जाऊ नको अशीच प्रतिक्रिया दिली. जायला नव्हतं पाहिजेस, थांबायला हवं होतंस असंच ते म्हणाले. सचिन मोटे, सचिन गोस्वामी सर म्हणाले होते की विचार कर. पण मी म्हणालो, 'तोचतोचपणा आलाय त्यामुळे मी जात आहे.' मग तेही म्हणाले हरकत नाही. पण मी फक्त तो शो सोडला. मित्र सोडले नाहीत. सगळे आपापल्या कामात व्यग्र आहेत. आजही आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा छानच भेटतो." अशाप्रकारे गौरवने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली याबद्दल खुलासा केला.