Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू तर एकदम काकूबाई झालीयेस'; रुपाली गांगुलीला करावा लागला बॉडीशेमिंगचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:12 IST

Rupali ganguly: 'लोकांचं हेच बोलणं मला खूप त्रासदायक ठरत होतं.'

'अनुपमा' या मालिकेतून नावारुपाला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली (Rupali Ganguly). बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणाऱ्या रुपालीने या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर रुपालीची वरचेवर चर्चा रंगतांना दिसते. प्रचंड लोकप्रियता, यश, संपत्ती मिळवणाऱ्या रुपालीला एकेकाळी बॉडीशेमिंगचा सामना करावा लागला होता. 'इ टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे.

"माझ्या बाळाच्या जन्मानंतर माझं वजन कमालीचं वाढलं होतं. जवळपास ८३ किलो माझं वजन झालं होतं ज्यामुळे मला बॉडीशेमिंगचा सामना करावा लागला. मी माझ्या बाळाला फिरायला घेऊन जायचे त्यावेळी लोक मला सतत टोमणे मारायचे. 'अगं तू तर मोनिशा आहेस ना, किती जाड झालीयेस', 'अगं तू तर काकूबाई झालीये', असं लोक मला म्हणायचे. लोकांचं हेच बोलणं मला खूप त्रासदायक ठरत होतं. खरं पाहता एखाद्या व्यक्तीला असं बोलण्याचा अधिकार कोणाला नसतो", असं रुपाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "अनुपमा मालिका करत असतानासुद्धा मला लोकांनी दिसण्यावरुन ट्रोल केलं. तुझ्या चेहऱ्यावर किती सुरकुत्या आहेत, अरे ती जाड आहे रे असं लोक बोलायचे. पण, हो, आहे माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या, आहे मी जाड आणि मला तरी सुद्धा स्वत: वर गर्व आहे. मी जशी आहे तसं स्वत:ला स्वीकारलं आहे."दरम्यान, रुपाली गांगुली आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनय आणि मिनमिळाऊ स्वभाव यामुळे रुपालीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन