'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत दिसत असलेला मराठी अभिनेता विवेक सांगळेने (Vivek Sangle) नुकतंच मुंबईतील लालबागमध्ये नवीन घर घेतलं. गणेशोत्सव जवळ असतानाच त्याने थेट लालबागमध्ये घर घेतलं. विवेक लालबागच्या अभ्युदयनगर येथील चाळीतच वाढला आहे. त्याचे वडील मिल कामगार होते. लालबागमध्ये हक्काचं मोठं घर असावं अशी विवेकची आधीपासूनच इच्छा होती. अखेर त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कालच त्याच्या घराची वास्तुशांतही पार पडली. यावेळी त्याने 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला.
घर घेतल्यानंतर भावना व्यक्त करताना विवेक सांगळे म्हणाला, "खूप छान वाटतंय. अभ्युदयनगरमध्येच मी लहानाचा मोठा झालो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वत:चं घर असावं. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपण ज्या परिसरात वाढलोय तिथेच एक घर असावं. तसंच हा क्षण खूप खास यासाठी आहे कारण या इमारतीच्या बाजूलाच दिग्विजय टेक्सटाईल मिल आहे जिथे माझे वडील काम करायचे. तेव्हा मी अभिनेता होईन ही कल्पनाही मी केली नव्हती. २००० साली वडिलांची मिल बंद झाली होती तेव्हा सतत वाटायचं की त्यांनी जिथे काम केलंय तिथेच त्यांच्यासाठी एक घर घ्यावं. घरातून त्यांना त्यांची मिल दिसेल असा व्ह्यू असावा. ते स्वप्न पूर्ण झालं आहे."
तो पुढे म्हणाला, "कोणी कुठेही घर घेऊ दे प्रत्येकाची ती अचिव्हमेंट असते. मला एक व्ह्यू हवा होता की घरातून माझ्या वडिलांना त्यांची मिल दिसावी. अगदी झाडू मारण्यापासून ते हेड फिटर होईपर्यंत ते पोहोचले होते. त्यांचा जन्म इथलाच आहे. ७० वर्ष ते इथेच आहेत. आईही गेली ५० वर्ष इथेच आहे. या पैशात मी दुसरीकडे कुठेही मोठं घर घेऊ शकलो असतो. पण त्यांना मला या परिसरापासून दूर न्यायचं नव्हतं. म्हणून मी इथेच घर घेतलं."
विवेक सांगळेने २००९-१० साली अभिनय क्षेत्रात आला. त्याने 'आई माझी काळूबाई', 'लव्ह लग्न लोचा', 'भाग्य दिले तू मला' या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'भाग्य दिले तू मला'मध्ये त्याची आणि तन्वी मुंडलेची जोडी गाजली. तर आता तो 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.