Rahul Vaidya Virat Kohli Instagram Controversy: 'इंडियन आयडल' शोमुळे प्रकाशझोतात आलेला राहुल वैद्य आता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. हा गायक 'बिग बॉस', 'लाफ्टर शेफ' सारख्या अनेक शोमध्ये दिसला आहे. तो कायम चर्चेतही असतो. राहुल अनेकदा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं आपल्या इन्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं म्हणताना दिसून आला होता. यातच आता त्यानं पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं इन्टाग्रामवर अनब्लॉक केल्याचं सांगितलंय. राहुलनं इन्स्टाग्रामवर विराट कोहलीसाठी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यानं विराटवर कौतुकाचा वर्षाव केलाय.
विराटनं अनब्लॉक करताच राहुलचा सूर बदललेला दिसला. राहुल वैद्यने इंस्टाग्रामवर पोस्ट करत विराटचे आभारही मानले. त्याने पोस्ट शेअर करत लिहलं, "अनब्लॉक केल्याबद्दल विराट कोहलीचे आभार. क्रिकेटमधील अद्भूत फलदाजांपैकी तू एक आहेस, भारताचा अभिमान आहेस. तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर देवाचे आशीर्वाद राहोत. तसेच ज्या बालिश लोकांनी माझी पत्नी, बहिणीशी गैरवर्तन केले, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या प्रियजनांना अनेक शिव्या पाठवल्या आणि अजूनही ते या गोष्ट करत आहेत, देव त्यांना सद्बुद्धी देवो. मी तुमच्यासाठी असेच किंवा त्याहूनही वाईट गोष्टी लिहू शकतो, पण मी लिहिणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता वाढेल जी आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाही", असं त्यानं म्हटलं.
यासोबतचं राहुलने विराटचा भाऊ विकासला उद्देशून लिहलं, "विकास कोहली भाई, तुम्ही मला जे काही ऐकवलं, त्यावरुन मला वाईट वाटत नाही, कारण मला माहितेय तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात. मॅन्चेस्टर किंवा ओव्हल स्टेडियमच्या बाहेर झालेल्या आपल्या भेटीत तुम्ही माझ्या गाण्याबद्दल मला सांगितलेल्या चांगल्या गोष्टी मला आठवत आहेत".
काय झाला होता वाद?
राहुल वैद्य आणि विराट कोहली यांच्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठा वाद रंगला होता. हा वाद विराट कोहलीच्या एका चुकून दिलेल्या 'लाइक'मुळे सुरु झाला होता. विराटने अभिनेत्री अवनीत कौरच्या एका पोस्टला चुकून 'लाइक' केलं होतं, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर स्पष्टीकरण देताना विराटने सांगितलं होतं की, "इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे हे घडलं". मात्र, या प्रकरणात राहुल वैद्यने उडी घेतली आणि विराटवर अप्रत्यक्ष टोले लगावले. राहुलने म्हटले होते की, "विराटने मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे, कदाचित हेही अल्गोरिदममुळेच झालं असेल". त्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी राहुलवर सोशल मीडियावर जोरदार टीका केली.
राहुलने मात्र इथेच थांबला नाही. त्याने सोशल मीडियावर एकामागोमाग एक पोस्ट शेअर करत हा वाद अधिक पेटवला. एवढंच नाही तर, राहुलने एका प्रतिक्रियेत विराट कोहलीच्या चाहत्यांना "विराटपेक्षा मोठे जोकर" असे म्हणत टीका केली होती. या सर्व प्रकरणावर विराट कोहलीने अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्याचे भाऊ विकास कोहली यांनी राहुलच्या विधानांची निंदा केली होती.