मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवलेल्या उषा नाडकर्णी या सगळ्यांच्या लाडक्या आऊ आहेत. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत त्यांनी काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. उषा नाडकर्णी यांना सलमान खानच्या 'बिग बॉस'चीही ऑफर होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
उषा नाडकर्णींनी नुकतीच 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मला पहिलंच बिग बॉससाठी दोनदा विचारण्यात आलं होतं. पण, मी नाही सांगितलं कारण तेव्हा मी पवित्र रिश्तामध्ये काम करत होते. जर मी मालिका सोडून बिग बॉसमध्ये गेले असते तर एकता कपूरने मला चपलेने मारलं असतं". त्यांनी बिग बॉस मराठीचा अनुभवही सांगितला. "बिग बॉसमधून ज्या दिवशी मी घरी गेले तेव्हा मी भावाला घरी यायला सांगितलं होतं. जेव्हा मी घर बघितलं मी म्हटलं हॉल कोणी छोटा केला? तर भाऊ म्हणाला मोठ्या घरात राहून आलीस तर हे छोटंच वाटणार", असं त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "मी वेडी झाले होते. माझा गॅस ऑटोमॅटिक आहे की लायटरने चालू होतो तेदेखील आठवत नव्हतं. फोन कसा वापरायचा ते पण आठवत नव्हतं. मी सगळं विसरून गेले होते. माझा नंबर मला आठवत नव्हता. पहिल्याच वेळी एलिमेशन टास्कमध्ये ४-५ जणांनी माझं नाव घेतलं. माझं कोणाशीही भांडण नव्हतं. तेव्हा मला वाईट वाटलं होतं. मी विचार करत बसले आणि त्यामुळे माझं बीपी वाढलं. मला पहिल्याच दिवशी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं होतं".