Join us

प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:54 IST

प्रियाबद्दल मी काय बोलू...पवित्र रिश्तामध्ये साकारली वहिनीची भूमिका

अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) काही दिवसांपूर्वी कॅन्सरने निधन झालं. आजही तिच्या आठवणीत चाहते, सहकलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. प्रियाने 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. अंकिताच्या बहिणीची तिने भूमिका साकारली होती. मालिकेत त्यांच्या वहिनीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्वाती आनंदने (Swati Anand) नुकतीच प्रियाच्या निधनानंतर भावुक प्रतिक्रिया दिली आहे. हे बोलताना प्रियाच्या आठवणीत तिलाही रडू कोसळलं.

'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत स्वाती आनंद म्हणाली, "प्रियाबद्दल मी काय बोलू. कसम से ही तिची पहिली हिंदी मालिका होती. त्यात ती माझी मुलगी होती. मालिकेवेळी आम्ही एकत्र खूप छान मजा केली. नंतर मला पवित्र रिश्ता मालिका ऑफर झाली. प्रियालाही या मालिकेसाठी विचारणा झाली. तेव्हा तिने मला फोन करुन विचारलं की 'स्वाती ताई, पवित्र रिश्ता नावाची मालिका येत आहे. मी ती करु का?' मी तिला म्हणाले, 'नक्कीच कर बेटा. मलाही या शोबद्दल विचारलं गेलं आहे. खूप छान भूमिका आहे. जितकं मला माहित आहे त्यानुसार तुम्हा तीन बहि‍णींची खूप छान भूमिका आहे. तिघींमधली जी कोणती भूमिका ऑफर होईल ती तू नक्कीच केली पाहिजेस. आम्ही त्या मालिकेवेळी जे साडेचार-पाच वर्ष एकत्र काम केलं तो वेळ खूप खास होता. मालिकेतील सर्वच कलाकारांसाठी तो सुवर्ण काळ होता. आम्ही माणूस म्हणून, कलाकार म्हणून खूप शिकलो. त्या भूमिकांमधून आम्ही स्टार कलाकार होण्याकडे वाटचाल करत होतो. सगळ्यांनाच प्रसिद्धी मिळाली. आम्ही सगळ्यांनीच त्या मालिकेनंतर आपापल्या आयुष्यात खूप काही चांगलं केलं." 

"हो मला माहित होतं की प्रियाला कॅन्सर होता. आम्ही सगळेच तिच्यासाठी प्रार्थना करत होतो. तिच्याशी माझं शेवटचं बोलणं झालं तेव्हा तीही आम्हाला हेच म्हणाली होती की माझ्यासाठी प्रार्थना करा. मी आयुष्यात इतक्या गोष्टींशी लढले आहे आता याही आजाराचा सामना करेन आणि त्यातून बाहेर येईन. ती त्यावर मात करेल आणि बाहेर येईल याची आम्हालाही आशा होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही."

टॅग्स :प्रिया मराठेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता