टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. ती लिव्हर ट्युमरशी झुंज देत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. आता दीपिकाला कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. दीपिकाला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. तिच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
"गेले काही आठवडे माझ्यासाठी किती कठीण होते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. माझ्या पोटात वरच्या भागात दुखत असल्याने हॉस्पिटलला जावं लागत होतं. लिव्हरला टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर तो ट्युमर स्टेज २ कॅन्सर असल्याचं निदान झालं. आमच्या आयुष्यात आम्ही अनुभवलेला आणि बघितलेला हा सगळ्यात कठीण काळ आहे. सकारात्मक राहून याला सामोरं जायचा आणि खंबीर राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. तुमचं प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी यातून नक्कीच बाहेर पडेन. माझ्यासाठी प्रार्थना करा", असं म्हणत दीपिकाने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
दीपिका आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. दीपिकाला कॅन्सरचं निदान झाल्याने शोएब आणि त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. दीपिका आणि रुहानला दीड वर्षाचा मुलगा आहे. या सगळ्यातून दीपिका बरी होण्यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. दीपिका आधी टीव्ही अभिनेत्री हिना खानलाही कॅन्सरचं निदान झालं होतं. सध्या हिनाची केमोथेरेपी सुरू आहे.