झी मराठी वाहिनीवरील एका पाठोपाठ एक दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याचं वृत्त अगोदरच समोर आलं आहे. आता त्यानंतर अक्षरा-अधिपतीची 'तुला शिकवीण चांगलात धडा' ही मालिकादेखील लवकरच ऑफ एअर होणार आहे. खुद्द भुवनेश्वरीनेच याबाबत हिंट दिली आहे.
'तुला शिकवीण चांगलात धडा' मालिकेतील अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली. या मालिकेत शिवानी रांगोळे अक्षराची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता हृषिकेश शेलार अधिपतीच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री कविता मेढेकर भुवनेश्वरी या खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं. मात्र आता दोन वर्षांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
मालिका संपल्यानंतर काय प्लॅन आहेत, याबाबत कविता मेढेकर महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, "मालिका संपल्यानंतर दोन ते सव्वा दोन वर्षांनी मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी काही योजना करेन. एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचे ७५० हून अधिक प्रयोग झाले आहेत आणि ते सुरू राहतील. मला आणखी एखाद्या नाटकात काम करायला आवडेल. भूमिका आव्हानात्मक असेल तर मी कोणत्याही माध्यमात काम करेन". कविता मेढेकर यांच्या या वक्तव्यामुळे मालिका निरोप घेणार हे निश्चित झालं आहे. मात्र 'तुला शिकवीण चांगलात धडा'चा शेवटचा भाग कधी प्रसारित होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.