Join us

"पैसे फुकट गेले", केरळमध्ये फिरायला गेलेल्या मराठी अभिनेत्याने शेअर केला अनुभव, म्हणाला- "मी कोर्टात जाणार, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:07 IST

स्वप्निल राजशेखर यांनी कामातून ब्रेक घेत केरळ गाठलं आहे. सध्या ते केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. केरळमधील व्हॅकेशनचा अनुभव त्यांनी व्हिडिओतून शेअर केला आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची जोडी प्रेक्षकांना आवडते. या मालिकेत चारुहास सूर्यवंशी च्या भूमिकेत अभिनेता स्वप्निल राजशेखर आहेत. स्वप्निल हे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

स्वप्निल राजशेखर यांनी कामातून ब्रेक घेत केरळ गाठलं आहे. सध्या ते केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. केरळमधील व्हॅकेशनचा अनुभव त्यांनी व्हिडिओतून शेअर केला आहे. केरळमधील स्वच्छ रस्ते आणि निसर्गमय पर्यटन स्थळे पाहून अभिनेता भारावून गेला आहे. व्हिडिओमधून कौतुक करत उपहासात्मकपणे पैसे फुकट गेल्याचं म्हटलं आहे. "मी तीन दिवस झाले केरळ फिरतोय. एक दिवस कोचीला होतो, त्यानंतर मुन्नार आणि आज इथे एर्नाकुलम नॅशनल पार्कमध्ये फिरायला आलो आहे. मला माझे सगळे पैसे बुडल्यागत वाटायला लागलेत. मला अस्वस्थ व्हायला लागलंय. याचा त्रास होतंय. सगळं वाया गेल्यासारखं वाटतंय", असं ते व्हिडिओत म्हणतात. 

पुढे ते म्हणतात, "हे केरळमधले रस्ते बघा...या रस्त्यावर कागदाचा एक तुकडा दिसत नाहीये, प्लास्टिकचा रॅपर नाहीये, कोल्ड्रिंग-दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसत नाहीयेत, कचऱ्याचा ढीग दिसत नाहीये ना कोणी थुंकलेलं दिसतेय. मला अस्वस्थ व्हायला लागलाय. नुसता शुद्ध ऑक्सिजन आणि नुसतं निसर्गरम्य सोंदर्य...हे असं असतं का? असं नाही होत. आपल्याला प्लास्टिक-दारुच्या बाटल्या पाहिजे, कचऱ्याचा ढीग पाहीजे...रस्त्याने बोंबाबोंब शिव्या देत जाणारी पोरं पाहिजे, हे सगळं असल्याशिवाय मजा आहे का? हा फक्त निसर्ग बघायचा का आम्ही? यासाठी एवढे पैसे घातलेत का मी? हे बरोबर नाही. मी आता केरळ सरकारकडे जाणार, कोर्टात जाणार आणि माझे पैसे परत द्या सांगणार...प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांशिवाय शोभा आहे का? ही फसवणूक आहे...". 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता