Join us

'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीच्या चेहऱ्यामागचं गुपित उलगडलं, कलर्स मराठीची नायिका साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:36 IST

कलर्स मराठीच्या लोकप्रिय नायिकेची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, 'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीचा चेहरा समोर

झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांचा खजिना घेऊन आली आहे. काही दिवसांतच अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लक्ष्मी निवास ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. तर लक्ष्मी निवासच्या नंतर 'तुला जपणार आहे' या हॉरर मालिकेची घोषणा करण्यात आली होती. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची मालिकेबद्दल उत्सुकता वाढवली होती. पण, या मालिकेत कोणती अभिनेत्री दिसणार हे मात्र समजलं नव्हतं. 

'तुला जपणार आहे' मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. आता अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरुन पडदा हटविण्यात आला आहे. 'तुला जपणार आहे' मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. या शीर्षक गीतात मालिकेतील मुख्य नायिकेचा चेहरा दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रतीक्षाने याआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. कलर्स वाहिनीवरील 'अंतरपाट' या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. 'जिव्हाची होतीये काहिली' या मालिकेतही ती दिसली होती. 

"दिसत नसले तरी असणार आहे...तुला जपणार आहे", असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे बोल आहेत. हे शीर्षकगीत वैभव जोशी यांनी लिहिलं आहे. तर सावनी रविंद्र आणि आदित्य नीला यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. कुणाल भगतने मालिकेच्या शीर्षकगीताला संगीत दिलं आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी