Join us

उधळलेल्या बैलाला 'प्राजक्ता'ने शिताफीने काबूत आणले; अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:20 IST

अभिनेत्री प्राजक्ताचा उधळलेल्या बैलाला सावरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यामुळे तिचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतंय

सोनी मराठीवरील 'तुझं माजं सपान' (Tuza Maza Sapan) मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम सचिन मोटे - सचिन गोस्वामींच्या 'वेटक्लाऊड प्रॉडक्शन'तर्फे या मालिकेची निर्मिती केली जात आहे. ग्रामीण जीवनाची आणि कुस्तीची पार्श्वभूमी असणारी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अशातच या मालिकेविषयी एक मोठी अपडेट समोर येतेय ती म्हणजे मालिकेतील प्रमुख अभिनेत्री प्राजक्ताने उधळलेल्या बैलाला कसं शांत केलं याचा थरारक अनुभव सांगितला आहे. 

मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामींनी एक व्हिडीओ शेअर करुन लिहीलंय की, "'तुजं माजं सपान' या सोनी मराठी वरील मालिकेतील नायिका पैलवान प्राजक्ता ही मुळातच एक कुस्तीपटू आहे..साताऱ्यातील एका गावात, शेतकरी कुटुंबात वाढलेली प्राजक्ता आता एक यशस्वी आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. आमच्या वेटक्लाउड प्रॉडक्शन्स च्या या तुजं माजं सपान या सोनी मराठी वरील दैनंदिन मालिकेत नुकतच एक साहस दृश्य चित्रित झालं .यात एका उधळलेल्या बैलाला प्राजक्ता शिताफीने काबूत आणते आणि शाळकरी मुलांचा जीव वाचवते.."

गोस्वामी पुढे लिहीतात, "या चित्रीकरणाच्या निमीत्ताने प्राजक्ताच्या धडाडीचे कौतुक वाटले . अनोळखी प्राण्या सोबत चित्रीकरण हे अत्यंत जिकिरीचे काम .. त्यात उधळलेला बैल सावरणे..त्या साठी अनेकदा प्रत्येक शॉट साठी त्या बैला सोबत अभिनय करायचा हे सगळं कठीण काम प्राजक्ताने अगदी सहजतेने केलं. या मागे तिचं गावात, शेतात,विविध प्राण्यांच्या सोबत घालवलेल्या काळाचा अनुभव कमी आला.."

गोस्वामी शेवटी लिहीतात, "प्राजक्ता ही खूप चांगली अभिनेत्री तर आहेच पण कुस्तीपटू आणि शेती कन्या आहे.. प्राजक्ताच्या या धाडसाचे कौतुक आणि तिच्या मातीशी घट्ट असलेल्या नात्याचा आदर वाटतो.." अशी पोस्ट लिहून गोस्वामींनी प्राजक्ताला शुभेच्छा दिल्यात. प्राजक्ताने शूटींगसाठी केलेल्या धाडसाचं खुप कौतूक होतंय. तुझं माझं सपान मालिका सोनी मराठीवर संध्याकाळी ७ वाजता बघायला मिळेल

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी