Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू तेव्हा तशी'फेम अभिनेत्याच्या पदरात नवी मालिका; दिव्या पूगांवकरसोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:28 IST

Marathi actor: या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच  ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेची चर्चा रंगली आहे. मुलगी झाली हो च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्या पुगांवकर या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्येच आता तिला मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्याची साथ मिळणार आहे. अभिषेक रहाळकर (Abhishek Rahalkar) या मालिकेत दिव्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

'मन धागा धागा' या मालिकेत अभिषेक सार्थक ही मुख्य भूमिका साकारणार आहे. स्वत:ला कामात सतत गुंतवून घेणारा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणारा असा हा सार्थक. काकांच्या निधनानंतर आणि वडील आजारी पडल्यानंतर सार्थकने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. यामध्येच आता त्याच्या आयुष्यात आनंदी येणार आहे. त्यामुळे या मालिकेत एक लव्हस्टोरीही पाहायला मिळणार आहे.

‘स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा होती जी 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेमुळे पूर्ण होतेय. स्वत:पेक्षा कुटुंबावर प्रेम करणारा आणि सतत कामाचा विचार करणारा सार्थक मी साकारतोय. ही भूमिका साकारताना खूप नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी मुळचा नाशिकचा. मालिकेची गोष्टही नाशिकमधली दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. मला लहानपणापासूनच कलेची आवड होती. वकृत्व स्पर्धा असो, पाठांतर स्पर्धा असो मी आवर्जून भाग घ्यायचो. आईने मला खूप प्रोत्साहन दिलं. चार लोकांसमोर उभं राहून आत्मविश्वासाने बोलता यायला हवं असा तिचा आग्रह असायचा. या स्पर्धांमधूनच अभिनयाची आवड वाढत गेली, असं अभिषेक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, शाळा आणि कॉलेजमध्ये मग नाट्यस्पर्धेत भाग घ्यायचो. घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नसल्यामुळे या क्षेत्राविषयी फार माहिती नव्हती. मनापासून जे करायचं आहे तेच करु हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. अभिनयाच्या वेडापायीच मी मुंबई गाठली आणि मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. मन धागा धागा जोडते नवा मालिकेतलं सार्थक हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे. 

दरम्यान, या मालिकेतून घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं जाणार आहे. घटस्फोटित महिलांकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. समाज तर सोडाच पण घरच्यांकडूनही त्यांना खंबीर साथ मिळत नाही. आनंदीही त्यापैकीच एक. जगण्यातला सूर हरवलेल्या मात्र तरीही आनंदात रहाण्यासाठी धडपडणाऱ्या आनंदीची गोष्ट या नव्या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी